Kolhapur Politics: मी आता फार पुढे गेलोय, समरजीत घाटगे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:02 IST2024-08-22T13:58:34+5:302024-08-22T14:02:56+5:30
'मागच्या दाराने येणार नाही'

Kolhapur Politics: मी आता फार पुढे गेलोय, समरजीत घाटगे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
कोल्हापूर : भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेले माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मी फार पुढे गेलो आहे आता मागे फिरणे अशक्य आहे अशा स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री घाटगे यांची त्यांच्या नागाळा पाकमधील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
महाडिक म्हणाले, तुम्ही गेली दहा वर्षे कष्ट घेतलेले आहेत. भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये योगदान दिलेले आहे. परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये आपली अडचण झाली आहे हे आम्ही समजून आहोत. तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा.
यावेळी समरजीत घाटगे म्हणाले, पक्षाचेच चिन्ह घेऊन गेली अनेक वर्षे मी काम करत आहे. एकही दिवस विश्रांती घेतली नाही. पक्षाचे चिन्ह मतदारसंघात पोहोचवले. परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की आता जागा वाटपामध्ये भाजपला फारसा वाव नसला तरी मला थांबणे शक्य नाही. मी पुढे गेलो आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी आमदार अमल महाडिक, प्रदेश कार्यकारिणी सचिव महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम हे उपस्थित होते. महायुतीच्या आज होणाऱ्या जाहीर सभेला घाटगे यांनी उपस्थित राहावे अशी विनंती त्यांना करण्यात आली परंतु याबाबतही नकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.
मागच्या दाराने येणार नाही
आपण गेली दहा वर्षे मतदारसंघात काम केले आहे. अनेक प्रश्न मांडले आहेत. अनेक प्रश्न सोडवले आहेत. अशा परिस्थितीमध्ये विधानपरिषदेसारख्या मागच्या दाराने येणे पसंत नसल्याची भूमिकाही ही यावेळी घाटगे यांनी मांडल्याचे समजते. त्यामुळे अन्य कोणत्यातरी पक्षातर्फेच मला लढत द्यावी लागेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.