गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 10:31 AM2024-11-06T10:31:46+5:302024-11-06T10:32:56+5:30
आठवड्याला दूधाच्या माध्यमातून पैसा मिळू लागल्याने प्रत्येक कुटुंबात दुधाची क्रांती आणण्याचे काम काम रवींद्र आपटे यांनी केले आहे.
- सदाशिव मोरे
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व महानंदा दूध डेअरीचे उपाध्यक्ष रवींद्र पांडुरंग आपटे यांचे रात्री निधन झाले. त्यांनी गोकुळ दूध संघावर सलग ३५ वर्षे संचालक, दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. वासरू संगोपनसारख्या योजना गोकुळच्या माध्यमातून राबवून शेतकरी कुटुंबात क्रांती घडविण्याचा प्रयत्न रवींद्र आपटे यांनी केला. कोल्हापूर येथे दुपारी १२ नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
१९८७ पूर्वी त्यांनी बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेऊन उत्तूर ( ता. आजरा ) येथे गाईचा गोठा सुरू केला होता. देशात परदेशातही चांगल्या नोकरीची संधी असताना त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे दिले. आपल्या गाईच्या गोठ्यातील दूध पाठविण्यासाठी उत्तुर येथे जनता दूध डेअरीची स्थापना केली. त्यांनी गायीच्या गोठ्याच्या माध्यमातून विविध प्रयोगातून दूधाची वाढ केल्यामुळे गोकुळ दूध संघावर काम करण्याची संधी मिळाली. १९८७ ते २०२२ पर्यंत सलग ३५ वर्षे गोकुळवर त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे.
तालुक्यात १५ ते २० असणाऱ्या दूध संस्था त्यांच्या काळात ३०० ते ३५० च्या दरम्यान पोहोचल्या. दूधामध्येही विक्रमी वाढ झाली. दूध संस्था गावोगावी तयार झाल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहू लागले. आठवड्याला दूधाच्या माध्यमातून पैसा मिळू लागल्याने प्रत्येक कुटुंबात दुधाची क्रांती आणण्याचे काम काम रवींद्र आपटे यांनी केले आहे.
गोकुळच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास शंभर ते दीडशे मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. आजरा ट्रान्स्पोर्ट हा व्यवसायही त्यांनी चांगल्या पद्धतीने चालविला.उत्तूर व आजरा येथील शेतीमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. त्यांच्या पश्चात महालक्ष्मी बँक कोल्हापूरच्या संचालिका पद्मजा आपटे, दोन मुलगे, सून व भाऊ सुधीर आपटे असा परिवार आहे.