ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हडपली, राजेश क्षीरसागरांचा आरोप
By भारत चव्हाण | Published: November 16, 2023 07:39 PM2023-11-16T19:39:47+5:302023-11-16T19:41:16+5:30
२ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा ख्रिश्चन समाजाने दिला इशारा
कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हाडपली असल्याचा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी येथे केला. ख्रिश्चन समाजाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी क्षीरसागर यांना भेटून दफनभूमीच्या जागेबाबत चर्चा केली. त्यानंतर क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा केली. अन् त्यांनी हा आरोप केला.
ख्रिश्चन समाजाला दफनभूमी साठी जागा उपलब्ध करताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत होती. सन २०१४ पासून कदमवाडी येथील जागा दफनभूमीला देण्याची प्रक्रिया सुरु होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही जागा दफनभूमीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना सद्यस्थितीत ही जागा डी. वाय. पाटील महाविद्यालय या संस्थेला देण्यात आली असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना जनतेचे पालकत्व स्वीकारून जनतेच्या जिव्हाळ्याची कामे बाजूला ठेवून जनतेच्या जागा हडपण्याचे पाप माजी पालकमंत्र्यांनी केले असून याचे उत्तर जनताच त्यांना देईल, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.
एकीकडे ख्रिश्चन समाजाला दफनविधी करण्याकरीता जागा उपलब्ध होत नसताना नियोजित केलेली जागा परस्पर खाजगी संस्थेला देण्यात आली? या मागील गौडबंगाल काय आहे? जागेच्या मोबदल्यात आवश्यक शासकीय शुल्क संबधित संस्थेने भरले आहे का? कोणत्या आधारावर सदर जागा दिली गेली? अशी विचारणा क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना केली. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पर्यायी जागा देण्याचा विचार करु
याबाबत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दफनभूमीसाठी पर्यायी जागा देता येईल का? याचा विचार केला जाईल, असे सांगितले.
२ जानेवारीपासून आमरण उपोषण
ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने आपल्या वेदना राजेश क्षीरसागर तसेच प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या समोर मांडली. जर यातून मार्ग निघाला नाही तर महापालिकेच्या दारात २ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला दिला.