जिल्हा बँक, गोकुळ दूध संघात सत्तांतर?; खासदार महाडिकांच्या दाव्यावर माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 05:15 PM2022-08-04T17:15:27+5:302022-08-04T17:16:29+5:30

..त्यानंतर ते याबाबतचा उल्लेख कधीच करणार नाहीत

Former minister Hasan Mushrif said on the claim of MP Dhananjay Mahadik of power transition in Gokul Sangh, District Bank | जिल्हा बँक, गोकुळ दूध संघात सत्तांतर?; खासदार महाडिकांच्या दाव्यावर माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले..

जिल्हा बँक, गोकुळ दूध संघात सत्तांतर?; खासदार महाडिकांच्या दाव्यावर माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले..

Next

कोल्हापूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातही बदल होणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. यावर माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनीही याआधी स्पष्टीकरण देत कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर आज, पुन्हा माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफांनी देखील यावर भाष्य केलं आहे. मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक यांनी केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघाची सत्ता याबाबत केलेला दावा मी प्रसारमाध्यमांमध्ये वाचला आणि बघितला. खासदार महाडिक यांनी कदाचित हा दावा आमदार सतेज पाटील यांना नजरेसमोर धरून केला असावा. दरम्यान;  या दोन्हीही संस्थांच्या सत्तांमध्ये हसन मुश्रीफ हासुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील.

ते पुढे म्हणाले, केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन्हीही ठिकाणी सत्ताबदल अजिबात होणार नाही. कारण निवडून आलेले जे संचालक आहेत त्यांच्यासाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी खस्ता खालेल्या आहेत. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नसावा.

उच्चांकी दूध दरवाढ

बँकेची सत्ता अनेक वर्ष आपल्याकडे आहे. गोकुळ दूध संघाची सत्ता वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे आलेली आहे. गोकुळच्या इतिहासात म्हशीच्या दुधाला लिटरला सहा रुपये आणि गाईच्या दुधाला लिटरला पाच रुपये इतकी उच्चांकी दूध दरवाढ केलेली आहे. वार्षिक तीन हजार रुपये कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल वाढलेली आहे. तसेच; यापूर्वी दूध पावडर निर्मितीमध्ये गोकुळ दूध संघाला कधीच फायदा होत नव्हता. निव्वळ गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १२ कोटी रुपये फायदा हा दूध पावडर विक्रीमधून झालेला आहे.

"त्यांना खासगीत पटवून देईन....."

नजीकच्या काळात खासदार महाडिक आणि माझी भेट झाली तर मी त्यांना समजावून सांगून पटवून देईन. या दोन्हीही संस्थांची आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभार, याबाबत त्यांना समजावून सांगेन. त्यानंतर ते याबाबतचा उल्लेख कधीच करणार नाहीत, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Web Title: Former minister Hasan Mushrif said on the claim of MP Dhananjay Mahadik of power transition in Gokul Sangh, District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.