‘दक्षिण’मधून महाडिक, ‘इचलकरंजी’तून आवाडे; भाजपची पहिली यादी जाहीर; कोल्हापुरात दोनच जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:29 PM2024-10-21T12:29:26+5:302024-10-21T12:33:27+5:30
आघाडीचा गुंता सुटेना : इतर पक्षातील इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने रविवारी दुपारी विधानसभा उमेदवारांची ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये कोल्हापुरातील तिघांचा समावेश आहे. ‘कोल्हापूर दक्षिण’मधून माजी आमदार अमल महाडिक, ‘इचलकरंजी’तून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे, तर ‘कोथरुड’ पुणे येथून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने बाजी मारली असून, महाविकास आघाडीचा गुंता अद्याप कायम आहे. इतर पक्षातील इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.
विधानसभेसाठी उद्या, मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. पण, उमेदवारीचे भिजत घोंगडे कायम राहिल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. त्यातच भाजपने पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे.
कोल्हापुरात भाजपला दोनच जागा
महायुतीमध्ये भाजपला ‘कोल्हापूर दक्षिण’ व ‘इचलकरंजी’ या दोनच जागा मिळणार हे स्पष्ट झाले. उर्वरित आठ जागांमध्ये दोन ‘जनसुराज्य’, दोन ‘राष्ट्रवादी’, तर तीन ‘शिंदेसेना’ असे वाटप होईल. राजेंद्र पाटील - यड्रावकर हे ‘धनुष्यबाण’ की अपक्ष लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
अमल महाडिक तिसऱ्यांदा रिंगणात
अमल महाडिक हे भाजपकडून २०१४ला पहिल्यांदा ‘कोल्हापूर दक्षिण’मधून विधानसभेच्या रिंगणात उतरले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विधिमंडळात धडक दिली. मात्र, २०१९ला त्यांचा पराभव झाला. आता ते तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. त्यांचे वडील महादेवराव महाडिक हे सलग २६ वर्षे विधानपरिषदेचे सदस्य होते.
आवाडे कुटुंबातील तिसरी पिढी मैदानात
कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी १९८०ला ‘इचलकरंजी’तून विधानसभेपासूनच राजकारणाची सुरुवात केली. त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले, त्यानंतर ते खासदारही झाले. त्यांच्या पाठोपाठ प्रकाश आवाडे हे १९८५ला आमदार झाले. १९९०चा अपवाद वगळता १९९५, १९९९, २००४ला काँग्रेसचे आमदार झाले. या कालावधीत त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री म्हणूनही काम केले. २००९ व २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र, २०१९मध्ये अपक्ष निवडून आले आणि भाजपला पाठिंबा दिला. यावेळेला त्यांनी रिंगणातून माघार घेत सुपुत्र राहुल यांना मैदानात उतरवले आहे. ‘राहुल’ यांच्या निमित्ताने आवाडे कुटुंबातील तिसरी पिढी विधानसभेच्या रिंगणात उतरली आहे.
चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा ‘कोथरुड’मधून
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपने दुसऱ्यांदा ‘कोथरुड’ (पुणे) येथून उमेदवारी दिली आहे. पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून दोनवेळा विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २०१९मध्ये ते पहिल्यादांच ‘कोथरुड’मधून विधानसभेत गेले. पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा येथून संधी दिली आहे.