माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कोरोनाचा संसर्ग, शहरात नवीन १८० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:13 PM2020-08-27T12:13:34+5:302020-08-27T12:15:50+5:30
कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग सुरूच असून रोज नवीन रुग्ण समोर येऊ लागले आहेत. बुधवारी माजी आमदार महादेवराव महाडिक, भुदरगडचे प्रांताधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जिल्हा एड्स नियंत्रण समन्वय अधिकारी दीपा शिपूरकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग सुरूच असून रोज नवीन रुग्ण समोर येऊ लागले आहेत. बुधवारी माजी आमदार महादेवराव महाडिक, भुदरगडचे प्रांताधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जिल्हा एड्स नियंत्रण समन्वय अधिकारी दीपा शिपूरकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. बुधवारी कोरोनाचा संसर्ग झालेले १८० नवीन रुग्ण शहरातील विविध भागांत आढळून आले; तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी काल त्यांची कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे पत्रक जाहीर केले. त्यांनी या संकटाचा धैर्याने आणि जिद्दीने मी सामना करेन, आणि प्रकृतीची उत्तम काळजी घेईन याबद्दल निश्चिन्त राहावे असॆ आवाहन केले आहे.
अलीकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्यांची आपली कोविड १९ चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यानच्या काळात कोणतेही अडचणीचे काम असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा, असेही त्यांनी कळविले आहे.
शहरातील बहुतांश भागांत आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्याने एकही भाग सोडलेला नाही. गर्दीची ठिकाणे, रुग्णांचा नजीकचा संपर्क आणि पुरेशी काळजी न घेतली गेल्यामुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
बुधवारी शहरात १८० रुग्ण आढळून आले. त्यामध्ये शिवाजी पेठेतील १३, राजारामपुरीतील १०, कसबा बावडा येथील चार, मंगळवार पेठेतील ११, तर शाहूपुरी, जवाहरनगर, कदमवाडी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क येथील प्रत्येकी सात रुग्णांचा समावेश आहे.
लक्ष्मीपुरी, कपीलतीर्थ भाजी मंडई येथे व्यापारी व विक्रेत्यांना संसर्ग होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या दोन्ही ठिकाणी महानगरपालिकेने घेतलेल्या तपासणी मोहिमेत १५ हून अधिक व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
आतापर्यंत शिवाजी पेठेत ३७० तर राजारामपुरीत ४३१ रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवार पेठेत ३०२ , शाहूपुरीत २११ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता ५५३० वर, तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या १७० वर जाऊन पोहोचली.