कोल्हापूर: वडगावचे माजी आमदार अॅड. नानासाहेब माने यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:45 AM2022-07-14T11:45:28+5:302022-07-14T11:46:03+5:30
वडगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात विजयी गुलाल उधळून ते विधानसभेत पोहचले.
सुहास जाधव
पेठवडगाव : कोल्हापूर येथील जवाहर नगर येथे माजी आमदार अॅड नानासाहेब माने यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. माने यांनी विधानसभा निवडणुकीत वडगाव मतदारसंघातून विजय मिळविला होता. मिस क्लार्क होस्टेलचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणा, पुतणी असा परिवार आहे.
घटना समितीच्या सुकाणू समितीचे सदस्य बॅ. शांताराम माने यांचे ते जेष्ठ चिरंजीव होते. माने यांनी एमपीसी परीक्षा उत्तीर्ण होऊन 12 वर्षे उपजिल्हाधिकारी सेवा बजावली होती. १९७८ ला सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात उतरले. यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून आरक्षित असणार्या वडगाव विधानसभा मतदारसंघात नशिब अजमावले. पहिल्याच प्रयत्नात विजयी गुलाल उधळून ते विधानसभेत पोहचले. १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा त्यांनी सरकारला पाठिंबा दिला होता.
वडगाव परिसरात महाविद्यालयीन शिक्षणांची सोय नव्हती. त्यावेळी त्यांनी १९८० ला जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरू केले. पहिल्या टप्प्यात ज्यूनिअर नंतर सिनिअर काॅलेज सुरू केले. कोल्हापूर सह वडगाव परिसरातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.