कोल्हापुरात लंगोट लावून प्रकाश शेंडगेंना केले चितपट, मराठा समाजाकडून अनोखा निषेध
By पोपट केशव पवार | Updated: December 9, 2023 15:55 IST2023-12-09T15:35:37+5:302023-12-09T15:55:50+5:30
ओबीसीमध्ये आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोटा लावून राहिले पाहिजे असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले होते

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना कोल्हापुरातील दसरा चौकात प्रतिकात्मकरित्या चितपट करून सकल मराठा समाजाने शनिवारी निषेध व्यक्त केला. शेंडगे यांना प्रतिकात्मकरित्या पैलवान बनवून मराठा समाजाच्या पैलवानाने लंगोटा घालून त्यांना चितपट केले.
ओबीसीमध्ये आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोटा लावून राहिले पाहिजे असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शनिवारी सकाळी दसरा चौकात समाजाच्या पैलवानाने लंगोटा घालून मुखवटादारी शेंडगे यांना चितपट करण्याचे अनोखे आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेंडगे व मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'भुजबळ, शेंडगेचे करायचे काय' या घोषणेने परिसर दणाणून गेला. यावेळी वसंतराव मुळीक, विजय देवणे, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.