Kolhapur Politics: संजयबाबा, चंद्रकांत पाटील भेटीचे गुपित काय?, चर्चेला ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:07 IST2025-01-04T16:05:09+5:302025-01-04T16:07:21+5:30

पक्षप्रवेशाबद्दल चर्चा पण..

Former MLA Sanjay Ghatge met BJP leader Minister Chandrakant Patil Discussion in Kolhapur district | Kolhapur Politics: संजयबाबा, चंद्रकांत पाटील भेटीचे गुपित काय?, चर्चेला ऊत

Kolhapur Politics: संजयबाबा, चंद्रकांत पाटील भेटीचे गुपित काय?, चर्चेला ऊत

कोल्हापूर : विधानसभेच्या पराभवानंतर समरजित घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात पुन्हा अडचणी नकोत म्हणून त्यांचा प्रवेश रोखण्यासाठी माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. तसेच मंत्री पाटील यांनी महायुतीचे विरोधक म्हणून काम केलेले ‘गोकुळ’चे संचालक अभिजित तायशेटे यांच्या महाविद्यालयाला भेट दिल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माजी आमदार घाटगे आणि त्यांचे चिरंजीव ‘गोकुळ’चे संचालक अंबरिश घाटगे यांनी गुरुवारी रात्री मंत्री पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. समरजित घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाकडून लढत देऊन पराभूत झाल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. परंतु त्याची पुढची पक्षीय वाटचाल कशी राहणार आहे, याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत. 

समरजित यांचे अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुडवील आहे. कागलच्या भविष्यातील राजकारणाचा एक भाग म्हणूनच समरजित यांनी पुन्हा भाजपवासी होण्याआधीच संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा एक विचार पुढे आला असून त्यानुसारच ही भेट झाल्याचे सांगण्यात येते. खरेतर विधानसभा निवडणुकीवेळीच अशा हालचाली सुरू होत्या. पाटील आणि घाटगे यांचे गेल्या २५ वर्षांपासूनचे संबंध आहेत. जिल्ह्यात भाजपलाही आपली ताकद वाढवायची आहे. त्यामुळे घाटगे यांची ही भेट चर्चेत आली आहे.

दुसरीकडे ‘गोकुळ’चे संचालक अभिजित तायशेटे यांच्या महाविद्यालयाला गुरुवारी मंत्री पाटील यांनी भेट दिली. गेली दहा वर्षे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत तायशेटे होते. परंतु त्यांनी लोकसभेला शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे आणि त्यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे महायुतीच्या विरोधात प्रचार केला. इतकेच नव्हे तर आबिटकर यांच्या गोटातून ‘गोकुळ’ला संचालक झालेल्या तायशेटे यांनी विधानसभेला थेट आबिटकर यांनाच विरोध करून मोठा धक्का दिला. तायशेटे यांच्या या निर्णयाने आबिटकर यांनाही जास्त राबणूक करावी लागली. परंतु दोन्ही निवडणुकीत महायुतीला विरोध करणाऱ्या तायशेटे यांच्या महाविद्यालयाला निकाल लागून सव्वा महिना झाला नाही तोपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपचे ताकद वाढवण्याचे प्रयत्न

विधानसभेला मोठ्या संख्येने आमदार निवडून आल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले जिल्ह्यात दोनच आमदार आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी भाजप यापुढच्या काळात प्रयत्नशील राहणार आहे. याचाच एक भाग म्हणून संजय घाटगे आणि अभिजित तायशेटे यांच्या या भेटींकडे पाहिले जात आहे.

पक्षप्रवेशाबद्दल चर्चा पण निर्णय नाही

याबाबत माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य असते. आमच्या संस्थांच्या विविध कामांसाठी त्यांना आम्ही या पूर्वीही भेटत होतोच. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी भेटलो व त्यामध्ये भाजप पक्ष संघटनेविषयी बोलताना चर्चेच्या ओघात पक्षप्रवेशाबद्दलही बोलणे झाले हे खरे आहे; मात्र अजून कोणता अधिकृत निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार आहे.

Web Title: Former MLA Sanjay Ghatge met BJP leader Minister Chandrakant Patil Discussion in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.