मंत्री मुश्रीफांना पाठिंबा; माजी आमदार संजय घाटगेंना बक्षीस मिळणार, जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती होणार
By राजाराम लोंढे | Published: September 12, 2024 04:00 PM2024-09-12T16:00:17+5:302024-09-12T16:03:57+5:30
शासन नियुक्त आणखी दोन पदे भरणार
कोल्हापूर . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांना संधी मिळणार आहे. घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला होता. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना जिल्हा बँकेवर संधी दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडीवर शिकामोर्तब होणार आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात १९९८ पासून पालकमंत्री हसन मुश्रीफ व संजय घाटगे यांच्यात थेट लढत झाली होती. पण गेल्या चार वर्षात मुश्रीफ व घाटगे यांचे चांगले सूत जुळले आहेत. घाटगे यांच्या अन्नपूर्णा शुगर या गुळ प्रकल्पाला जिल्हा बँकेने अर्थसहाय्य केले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर बाजार समिती व गडहिंग्लज बाजार समिती या दोन्ही ठिकाणी घाटगे समर्थकांनाही संधी देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षातील मुश्रीफ-घाटगे गटांतर्गत हालचाली पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत घाटगे मुश्रीफ यांच्यासोबतच राहतील असे सूचक वक्तव्य अनेक वेळा केले जात होते.
पण दुसऱ्या बाजूला घाटगे यांची सुपुत्र गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती. अमरीश घाटगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू असतानाच संजय घाटगे यांनी साधारणता दीड महिन्यापूर्वी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेत मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. घाटगे यांच्या या त्यागाबद्दल मुश्रीफ यांनी अनेक वेळा त्याची भरपाई करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसारच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्वीकृत संचालकपदी त्यांची वर्णी लावण्याची चर्चा आहे.
बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय मोट बांधून बिनविरोध करण्याच्या नादात अनेक इच्छुकांना थांबवावे लागले होते. त्यातील काही जणांना स्वीकृत पदी घेण्याचा शब्द नेत्यांनी दिला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून बँकेचे निवृत्त अधिकारी आसिफ फरास, माजी संचालक विलासराव गाताडे, तर काँग्रेसकडून गोपाळराव पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मध्यंतरी स्वीकृत जागेसाठी जनस्वराज्याचे अध्यक्ष विनय कोरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यासाठी आग्रह धरल्याने गेली वर्षभर हा गुंता निर्माण झाला होता. मात्र राष्ट्रवादीकडून घाटगे यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने कुणाचा पत्ता कट होणार याविषयी उत्सुकता लागली आहे.
शासन नियुक्त आणखी दोन पदे भरणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून संजय घाटगे यांना संधी दिली असली तरी संचालक मंडळात अजून दोघांची नियुक्ती करता येऊ शकते. एक शासन नियुक्त प्रतिनिधी तर आणखी दुसऱ्याला स्वीकृत म्हणून घेता येऊ शकते. या दोन्ही जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे आसिफ फरास व काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.