सत्ता गेल्याने माजी आमदारांना नैराश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:08+5:302021-01-01T04:17:08+5:30
कसबा बावडा : सगळीकडची सत्ता गेल्यामुळे माजी आमदारांनी नैराश्यातून बावड्याच्या पाण्याच्या टाकीबाबत टीका केली आहे. त्यांनी अगोदर या ...
कसबा बावडा : सगळीकडची सत्ता गेल्यामुळे माजी आमदारांनी नैराश्यातून बावड्याच्या पाण्याच्या टाकीबाबत टीका केली आहे. त्यांनी अगोदर या पाण्याच्या टाकीच्या इतिहासाची माहिती करून घ्यावी, असा टोला माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी माजी आमदार अमल महाडिक यांना पत्रकार बैठकीत बोलताना लगावला.
नुकतीच माजी आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर प्रसिद्धिपत्रकातून टीका केली होती. त्यात बावड्याच्या पाण्याच्या टाकीचा संदर्भ होता. त्या टीकेला उत्तर देताना सालपे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, डॉ. संदीप नेजदार, अशोक जाधव, श्रावण फडतारे, श्रीराम सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे यांची उपस्थिती होती.
कसबा बावडा पाण्याच्या टाकीला २००६ पूर्वीची मंजुरी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहकार्यातून शिंगणापूर पाईपलाईन योजनेसाठी ३४ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमदार असताना आणला होता. याबाबत बावडेकरांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा पॅव्हेलियन ग्राउंडवर सत्कारही केला होता. पुढे २००८ ला या टाकीचे काम सुरू झाले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे काम थांबले. पुन्हा २०१८ मध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच या टाकीचे काम सुरू झाले. यावेळी या टाकीसाठी १२ ते १३ लाख रुपये पालकमंत्री पाटील यांनी स्वत: घातल्याचे सालपे म्हणाले. विधान परिषदेच्या माजी आमदारांनी गेल्या अठरा वर्षांत किती निधी आणला आणि कोल्हापूरसाठी काय केलं ? याचा हिशेब द्यावा, अशी मागणीही सालपे यांनी केली.
बावडेकरांवर डी. वाय. पाटील कुटुंबातील व्यक्ती एक कुटुंब प्रमुख म्हणून हक्काने बोलतात. त्यात त्यांच्या अहंकाराचा लवलेश आम्हा बावडेकरांना कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे आपण त्याची चिंता करू नये. बावडेकरांना विरोध म्हणून आपण गावचा एकही सभासद राजाराम कारखान्यासाठी करून घेत नाही. पाणंद दुरुस्ती करत नाही. यातून आपली कामाबाबतची तत्परता दिसून येत असल्याची टीकाही यावेळी सालपे यांनी केली.
या पत्रकार बैठकीस डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक जयसिंग ठाणेकर, श्रीराम सेवा संस्थेचे संचालक प्रमोद पाटील, मदन जामदार, विलास पिंगळे, सुधाकर कसबेकर, हरी पाटील, प्रवीण लाड, राजीव चव्हाण, माजी नगरसेवक अजित पोवार, जे. एल. पाटील, गजानन बेडेकर, तानाजी चव्हाण, आदी उपस्थित होते.