Kolhapur: मंडलिक गटाच्या भूमिकेवर मुश्रीफ-राजे गटाचा सावध पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:12 PM2024-10-11T12:12:35+5:302024-10-11T12:14:12+5:30
मंडलिक गटाला काय साध्य करायचे आहे..
कागल : कागल-गडहिंग्लज मतदारसंघातून माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र आणि मंडलिक साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना लक्ष्य करत टीका केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या समर्थकांनी गावोगावी एका रात्रीत मुश्रीफ आणि घाटगेंवर टीका असलेला एकाच आशयाचा मजकूर असलेले डिजिटल फलक उभारल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबद्दल मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे गटाने सावध पवित्रा घेतला आहे. कोणतेही भाष्य केलेले नाही.
‘हसनसाहेब, समरजितराजे, काय काय केलाय तुम्ही - हे विसरणार नाही आम्ही’ कट्टर मंडलिक समर्थक - कागल विधानसभा - २०२४ असा मजकूर या फलकावर आहे. गावातील प्रमुख चौकात ते उभारले आहेत. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी संजय मंडलिक यांची फसवणूक केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. मंडलिक गटाच्या या भूमिकेची चर्चा सुरू असतानाच इतके डिजिटल फलक अचानक उभे केले, याचा अर्थ पूर्वतयारी करून वीरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे.
मंडलिक गटाला काय साध्य करायचे आहे..
वीरेंद्र मंडलिक यांच्या भूमिकेचे पडसाद मतदारसंघात उमटले आहेत. त्यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार? अशी भूमिका घेण्यामागे मंडलिक गटाचा हेतू काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून प्रचारही करत असलेले मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे सदाशिवराव मंडलिक यांचे छायाचित्र वापरत आहेत. त्यावरही मंडलिक गटाने हरकत घेतली आहे.