शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षाची शिपायाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:01+5:302021-09-05T04:28:01+5:30
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या माजी संस्था अध्यक्षाने शाळेतील दोन शिपायांना मारहाण केली. यामुळे ...
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या माजी संस्था अध्यक्षाने शाळेतील दोन शिपायांना मारहाण केली. यामुळे ग्रामस्थांनी अध्यक्षाला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. मात्र, हुपरी पोलीसांच्या मध्यस्थीने समज व माफिनाम्यावर या प्रकरणावर पडदा पडला. मात्र या अध्यक्षाच्या प्रतापाबद्दल ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, शाळेतील दबावतंत्रातून राजीनामा, अनधिकृत नियुक्ता, संस्था विकण्याचा प्रयत्न, नवीन व जुन्या संचालक मंडळाचा वाद यावरून ही संस्था व अध्यक्ष यापूर्वीही वादग्रस्त ठरले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पट्टणकोडोली येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल ही जुनी माध्यमिक शाळा आहे. या संस्थेचे माजी अध्यक्ष वसंत जाधव हे शुक्रवारी शाळेत येऊन शिपाई गौतम कुंभार यांना राजीनामा दे म्हणून अरेरावी केली. तसेच त्याच्या जागी मयूर पाटील याचा प्रस्ताव पाठवण्याचा घाट घातला. त्यामुळे शिपाई गौतम कुंभार आणि बिरदेव धनगर यांनी याबाबत विचारणा केल्यावर माजी अध्यक्ष वसंत जाधव यांनी सर्वांसमोर दोघांना मारहाण केली. ही घटना समजताच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि ग्रामस्थांनी शाळेत जाऊन वसंत जाधव यांना धारेवर धरत जाब विचारला. जाधव यांची गाडी ग्रामस्थांनी तब्बल दोन तास अडवून ठेवली होती. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या वेळी या दोन्ही शिपाई, शिक्षक व ग्रामस्थ यांनी विद्यमान अध्यक्ष अभिजित जाधव यांच्याकडे केली. या वेळी हुपरी पोलिसांना कळविण्यात आले. उपनिरीक्षक विजय मस्कर हे घटनास्थळी येऊन एका बंद खोलीत विद्यमान अध्यक्ष, मुख्याध्यापक, दोन्ही शिपाई यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर माजी अध्यक्ष वसंत जाधव यांना समज देऊन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.