माजी तुरुंगाधिकारी टी. डी. कुलकर्णी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:57 PM2020-10-09T12:57:04+5:302020-10-09T12:58:08+5:30
culture, kolhapurnews, माजी तुरुंगाधिकारी, कारखानदार आणि वाङ्मय चर्चा मंडळाचे संस्थापक तुकाराम दत्तात्रय तथा टी. डी. कुलकर्णी (वय ९२) यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले.
कोल्हापूर : माजी तुरुंगाधिकारी, कारखानदार आणि वाङ्मय चर्चा मंडळाचे संस्थापक तुकाराम दत्तात्रय तथा टी. डी. कुलकर्णी (वय ९२) यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले.
कुलकर्णी यांनी तुरुंगाधिकारी म्हणून आर्थर रोड आणि येरवडा जेल पुणे येथे काम केले होते. नोकरी सोडून त्यांनी येथील उद्यमनगरमध्ये जयभवानी आयर्न वर्क्स हा कारखाना सुरू केला. त्यांनी नंतर हा व्यवसाय मुलाकडे सोपविला.
येथील शां. कृ. पंत वालावलकर ट्रस्ट रुग्णालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले होते. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि उद्यम नागरी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. कोल्हापूरमध्ये ग्राहक मंचचे काम सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
कोल्हापुरातील कोणत्याही सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमाला त्यांची हमखास उपस्थिती असायची. चोखंदळ वाचक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. लेखक किंवा वक्त्यांच्या न पटलेल्या मुद्द्यांवरही ते नेहमी कार्यक्रमानंतर चर्चा करत असत. त्यांच्या पश्चात मुलगा कुलकर्णी मेटल्स इंजिनिअर्सचे कमलाकांत कुलकर्णी, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.