कोल्हापुरात शिवसेनेला आणखी एक धक्का? माजी आमदाराची पावले भाजपच्या दिशेने

By विश्वास पाटील | Published: September 7, 2022 11:39 AM2022-09-07T11:39:14+5:302022-09-07T11:50:09+5:30

अजूनही मूळच्या शिवसेनेला राम राम केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही झेंडा खांद्यावर घेतलेला नाही

Former Shiv Sena MLA Chandradeep Narak steps towards BJP | कोल्हापुरात शिवसेनेला आणखी एक धक्का? माजी आमदाराची पावले भाजपच्या दिशेने

संग्रहित फोटो

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची पावले भाजपच्या दिशेने पडत असल्याची चर्चा आहे. त्यांनी अजूनही मूळच्या शिवसेनेला राम राम केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही झेंडा खांद्यावर घेतलेला नाही; परंतु मतदारसंघातील संभाव्य राजकीय कोंडी टाळण्यासाठी त्यांना भाजपचा पर्याय जास्त योग्य वाटत असल्याचे समजते. तूर्त त्यांचा पवित्रा ‘ठंडा करके खावो..’ असा आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र यावेत, अशी त्यांची भूमिका आहे; परंतु आजच्या घडीला ते संभवत नाही.

करवीर मतदारसंघातून नरके हे दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले आहेत. त्यांचा मतदारसंघात पारंपरिक विरोधक काँग्रेस आहे. नरके गट म्हणून स्वत:ची राजकीय ताकद, नवे तरुण नेतृत्व, दांडगा लोकसंपर्क आणि शिवसेनेचा आक्रमकपणा अशी मोट बांधून त्यांनी विजय खेचून आणला. हा मतदारसंघ काय शिवसेनेचे पॉकेट नाही हे खरे असले, तरी नरके यांना विजयी करण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची व भगव्या झेंड्याची मोठी मदत झाली आहे, हे पण नाकारता येत नाही; परंतु तरीही ते शिवसेना सोडून अन्य पर्याय शोधत आहेत, त्याची काही प्रमुख कारणे अशी :

>>शिवसेनेत बंड होऊन सरकार पडले तरी दोन्ही काँग्रेस व शिवसेना अजूनही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितच आहेत. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे त्यांचे नियोजन आहे. तसे झाल्यास हा मतदारसंघ विद्यमान आमदार असल्याने काँग्रेसच्या पी. एन. पाटील यांनाच मिळू शकतो. त्यावेळी नरके यांच्यापुढे बंडखोरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

>>ज्या शिवसेनेने दोन वेळा गुलाल दिला, त्यांच्याशी गद्दारी करून रिंगणात उतरले तर कोल्हापूरच्या जनतेला ते आवडणार नाही. त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे शिंदे गटात जाण्यापेक्षा थेट भाजपमध्येच गेल्यास गद्दारीचा डाग टाळता येऊ शकेल असाही त्यांचा होरा आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांची यासंबंधी चर्चाही झाली आहे.

>>विधानसभेच्या निवडणुकीशी कुंभी-कासारी कारखान्याचे राजकारण व अर्थकारणही जोडले गेले आहे. या कारखान्याला पॅकेजची आवश्यकता आहे. भाजपमध्ये गेल्यास केंद्र सरकारच्या मदतीने काही पॅकेज मिळवणे शक्य होईल, असाही हेतू आहे.

>>शिंदे गटाचे कोल्हापूरचे नेतृत्व आता माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे आहे. त्यांचा करवीर मतदारसंघाशी काहीच संबंध नाही. खासदार संजय मंडलिकही शिंदे गटात आहेत; परंतु तेच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा एकत्रच झाल्यास कमळ व मोदी यांच्या लोकप्रियतेचा लाभ होऊ शकतो असेही गणित मांडले जाऊ लागले आहे.

>>मुख्यमंत्री शिंदे गटाचे म्हाेरके म्हटले जाणारे आमदार रवींद्र फाटके हे नरके यांचे व्याही आहेत. त्यामुळे मतदारसंघातील अडचण सांगून मुख्यमंत्री शिंदे यांच्याच संमतीने भाजपचा झेंडा हातात घ्यावा अशा हालचाली आहेत. भाजपमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक यांची त्यांना राजकीय ताकद मिळू शकते. कोरे-नरके अशी प्राथमिक चर्चाही झाल्याचे समजते.

>>शिवसेनेचा शिये-वडणगे परिसरात जास्त दबदबा आहे; परंतु मूळची शिवसेना व नरके गट यांच्यातही फारसे सख्य नाही.

Web Title: Former Shiv Sena MLA Chandradeep Narak steps towards BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.