कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; उल्हास पाटील, सुजित मिणचेकर ‘स्वाभिमानी’त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:22 PM2024-10-29T12:22:46+5:302024-10-29T12:24:36+5:30
शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत राजकीय भूकंप
जयसिंगपूर : उद्धवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील व सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढविण्याचा निर्णय शिरोळ येथे सोमवारी रात्री माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत घेतला. दोघेही उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
दहा वर्षांनंतर माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील एकत्र दिसणार आहेत. महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्यानंतर तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे.
महाविकास आघाडीतून शिरोळची जागा काँग्रेसला गेल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार माजी आमदार उल्हास पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. सोमवारी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीतून पाटील यांची बंडखोरी होणार, अशी चर्चा सुरू होती.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी हातकणंगले मतदारसंघातील सुजित मिणचेकर, तर शिरोळचे उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीत प्रवेश करून निवडणूक लढवावी, यावर चर्चा झाली. या प्रस्तावावर रात्री उशिरा पाटील यांच्या निवासस्थानी देखील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला. या निर्णयामुळे कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना असा प्रचार आता तालुक्यात सुरू होणार आहे.
एकूणच विधानसभेच्या निमित्ताने तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे. दोन माजी आमदारांनी उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ठाकरे यांना कोल्हापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मिणचेकर व उल्हास पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत