शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:13 PM2022-04-22T19:13:30+5:302022-04-22T19:14:18+5:30
लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन एच १२ तसेच झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी१, बी२,बी५,बी६ या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळवण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे.
कोल्हापूर : शालेय पोषण आहार योजनेतून प्लास्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदळाचा किलोमागे दहा ग्रॅम या प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्यासाठीच केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रथमच अशा तांदळाचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी गुरुवारी दिली.
पालघर व अहमदनगर जिल्ह्यात या तांदळाचा पुरवठा झाल्यावर प्लास्टिकचा तांदूळ पुरवठा केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. भारतीय अन्नधान्य महामंडळाकडूनही अभिप्राय घेण्यात आला. त्यामध्ये हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा तांदूळ नियमित पद्धतीनेच शिजवावा, त्यासाठी कोणतीच वेगळी पद्धत अवलंबण्याची गरज नाही. कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा केला जात नाही. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार तांदूळ, डाळी, कडधान्ये घरी वितरित केले जात आहे.
या तांदळात काय आहे..
लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन एच १२ तसेच झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी१, बी२,बी५,बी६ या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळवण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे.
तरंगतो कशामुळे..?
प्रक्रिया करून तयार करण्यात आलेला हा तांदूळ नियमित तांदळापेक्षा वजनास हलका आहे. त्यामुळे पाण्यात घातल्यास तो तरंगतो. योजनेतून पुरवठा करण्यात आलेला तांदूळ पिवळसर दिसत असेल आणि पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर कांही तांदूळ तरंगत असल्याचे दिसल्यावर गैरसमज करून घेऊ नका, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.