राज्यात पंधरवड्यात २२ लाख घरगुती वीज मीटर उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:44 AM2018-08-27T07:44:43+5:302018-08-27T07:45:10+5:30
ग्राहकांना दिलासा; कोल्हापूर, सांगलीच्या हाती चार हजार मीटर
तानाजी पोवार
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात घरगुती वीज मीटरचा खडखडाट झाल्याने ग्राहकांतून ‘महावितरण’बाबत संताप व्यक्त होत होता. ‘महावितरण’मार्फत राज्यातील ग्राहकांसाठी सुमारे २२ लाख मीटर उत्पादनाची मागणी नोंदविली आहे; त्यानुसार संबंधित मान्यताप्राप्त कंपन्यांकडून वीज मीटर पुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
टप्प्याटप्प्याने मीटर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व विभागांत येतील. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर विभागासाठी (कोल्हापूर व सांगली) सुमारे चार हजार मीटर उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नजीकच्या कालावधीत मीटरचा नक्कीच तुटवडा भासणार नाही.
महावितरणकडून फेब्रुवारीमध्ये पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यासाठी सिंगल फेजची १ लाख ७५ हजार नवीन घरगुती वीजमीटर उपलब्ध झाली होती. पण हे मीटर जून महिन्याच्या प्रारंभीच संपले. त्यानंतर प्रत्येक कार्यालयात वीज मीटर मागणीसाठी ग्राहकांच्या चकरा सुरू झाल्या. राज्यभरातील मीटर मागणीबाबत आढावा घेऊन त्याबाबत अधिकृत पाच कंपन्याकडे सुमारे २२ लाख मीटरची मागणी नोंदविली आहे.
दोन कंपन्यांचे मीटर दोषयुक्त
‘महावितरण’ कंपनीकडून मान्यताप्राप्त सात कंपन्यांकडून वीज मीटर उत्पादन करून घेतले जाते; पण वर्षभरात दोन कंपन्याकडून वितरण झालेल्या बहुतांश मीटरमध्ये दोष आढळले. अनेकांची बिले अवाढव्य येऊ लागली, मीटर बंद पडू लागली. त्यामुळे त्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले व त्यांची मीटर बदलून, तेथे इतर पाच कंपन्यांची मीटर बसविली. त्यामुळे मीटरचा तुटवडा भासू लागला होता.