चाळीस हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:00 AM2019-09-17T01:00:46+5:302019-09-17T01:00:51+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ९०३ इतकी ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ९०३ इतकी आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची रक्कम तीन कोटी २३
लाख तीन हजार ९३६ आहे. ही माहिती कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने राज्य शासनाला सादर केली आहे. विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्राचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे.
विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील पूरबाधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या प्रथम सत्राचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील १८ महाविद्यालयांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. या महाविद्यालयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून मदतीसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके खरेदीसाठी विद्यापीठाकडून अर्थसाहाय्य देण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता
दिली आहे. उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने शासन आदेशानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या एकूण २१४ महाविद्यालयांतील पूरबाधित विद्यार्थ्यांची माहिती गेल्या १५ दिवसांत संकलित केली. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, विधी (लॉ) आणि शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यापीठाकडे विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या २३ महाविद्यालयांनी माहिती सादर केली आहे.
महापुराचा फटका बसलेल्या
संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
या महाविद्यालयांना मदत
गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (हलकर्णी), कलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन (नागाळा पार्क), श्री शहाजी छत्रपती कॉलेज, महावीर महाविद्यालय, म. ह. शिंदे महाविद्यालय (तिसंगी), एस. के. पाटील महाविद्यालय (कुरुंदवाड), एस. के. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय (प्रयाग चिखली). सांगली : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, ललितकला व नाट्यतंत्र शिक्षण महाविद्यालय, पुतळाबेन शाह कॉलेज आॅफ एज्युकेशन, गणपतराव अरवाडे कॉलेज, बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, आबासाहेब गरवारे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट. कºहाड : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय.