‘गूळ’ फसवणूक प्रकरणाची फाईल सापडली
By admin | Published: March 25, 2015 10:55 PM2015-03-25T22:55:23+5:302015-03-26T00:06:43+5:30
लोकमतचा दणका
कोल्हापूर : गूळ उत्पादक शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे २२ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाची गायब झालेली फाईल बुधवारी सापडली. ती फाईल आपल्याकडे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली. इतर गुन्ह्यांच्या तपासांत व्यस्त असल्याने फाईल माझ्याकडेच राहून गेल्याचा खुलासा चौधरी यांनी केला. या फसवणूकप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करून ४ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश शाहूपुरी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी १७ मार्चला अडत दुकानदार सचिन बरगे व सुनील पाटील यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला; परंतु ही फाईल गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच आठ दिवस गायब झालेली फाईल एका दिवसात सापडली. ती फाईल खुद्द पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आपल्या जवळ असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानुसार ४ एप्रिलपर्यंत तपास अहवाल सादर केला जाईल, असेही चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)