जयसिंगपूरच्या ‘युवा फौंडेशन’चा निराधारांना आधार

By admin | Published: March 4, 2016 11:30 PM2016-03-04T23:30:18+5:302016-03-04T23:53:30+5:30

आरोग्य सेवा देण्याचा संकल्प : शहरातील ३५ व्यक्तींना नियमितपणे जेवणाचा डबा पोहोच करण्याचा वसा

Foundation of the youth foundation of Jaysinghpur | जयसिंगपूरच्या ‘युवा फौंडेशन’चा निराधारांना आधार

जयसिंगपूरच्या ‘युवा फौंडेशन’चा निराधारांना आधार

Next


संतोष बामणे -- जयसिंगपूर
भुकेने कोणीही कासावीस होऊ नये व कोणीही उपाशी राहू नये या उदात्त हेतूतून एक वर्षापूर्वीपासून काही तरुण एकत्र येऊन निराधारांना आधार देत आहेत. निराधार ३५ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना नियमितपणे जेवणाचा डबा पोहोच करण्याचा वसा या तरुणांनी एक वर्षापासून जपला आहे. याच तरुणांनी नवीन वर्षात निराधारांना आरोग्य सेवा देण्याचा संकल्प करून, युवा फौंडेशनच्या माध्यमातून वंचितांना आधार दिला आहे.
शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन या समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी दोन वर्षांपूर्वी युवा फौंडेशनची स्थापना केली. या फौंडेशनच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक कामे करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून एक वर्षापूर्वी शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी अपंग, मनोरुग्ण, अंध, वयस्क, निराधार अशा अनाथ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना एक वेळच्या जेवणासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी दररोज सकाळी-सायंकाळी डबा पोहोच करण्याचे काम फौंडेशनने हाती घेतले आहे. एक वर्षापासून डबा पोहोच करण्याचे कार्य ते करीत आहेत.
शहरातील निराधार, अनाथ व्यक्तींना औषधोपचार व आरोग्य सेवा मिळाव्यात या हेतूतून जानेवारी २०१६ पासून युवा फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी धडपड सुरू केली आहे. गरीब, वंचित, निराधार अशा व्यक्तींचा शोेध घेऊन त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर प्रताप बंडगर यांच्या सहकार्याने प्रत्येक व्यक्तीला सेवा देण्याचे कार्य सुरू केले आहे. युवा फौंडेशनमध्ये अझर पटेल, सचिन चौगुले, इंद्रजित कदम, निखिल कुंभार, अमर पाटील, सचिन मोटे, रोहन शहापुरे, सुनील घोलप, किरण पाटील, रोहित खरात, प्रवीण पाटील, गीता शहा, डॉ. प्रताप बंडगर, नितीन पाटील-मजलेकर, मीनल चव्हाण, कनक शहा, बी. टी. नाईक, सुदर्शन कदम यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. जयसिंगपूर केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने औषधोपचार करण्यात येत आहेत.


मुलांसाठी अंगणवाडी
फौंडेशनच्या माध्यमातून जुलै २०१५ पासून गरीब विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडी सुरू करण्यात आली असून, मुलांना खाऊ, शालेय साहित्य, कपडे देण्यात येतात. तसेच एका शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली आहे. अशाप्रकारे विविध उपक्रम या युवा फौंडेशनकडून राबवून सामाजिक कार्याचा नवीन आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

फौंडेशनच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करून एक विधायक कार्य करण्याच्या हेतूने सामाजिक काम करण्यात येत आहे. गरीब, वंचितांना दोन वेळच्या जेवणाची व आरोग्याची सोय करून मानसिक समाधान मिळते. या कामासाठी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याची गरज आहे. तसेच तरुणांनी इतरत्र पैशांची उधळपट्टी न करता विधायक कार्यात आपला वेळ आणि पैसा खर्च करण्याची गरज आहे.
- अझर पटेल, सदस्य युवा फौंडेशन

Web Title: Foundation of the youth foundation of Jaysinghpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.