Kolhapur: पोटाला चिमटा घेऊन पैसे जमा केले, संस्थाचालकांनी हडपले; औरवाडच्या राजीव पतसंस्थेत साडेचार कोटीचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:23 PM2024-03-04T16:23:38+5:302024-03-04T16:24:21+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेत संस्थाचालकांनी साडेचार कोटीचा अपहार केल्याचे उघडकीस ...
गणपती कोळी
कुरुंदवाड : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेत संस्थाचालकांनी साडेचार कोटीचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या अपहारामुळे ग्रामीण भागातील मोलमजुरी करून पोटाला चिमटा घेऊन भविष्याची पुंजी सुरक्षित म्हणून संस्थेत ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांची गाळण उडाली आहे. संस्थाचालकांवर गुन्हा दाखल झाला असला तरी ठेवीदारांचे पैसे परत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतापराव आप्पाराव आगरे यांनी पुढाकार घेऊन १९९३ साली राजीव पतसंस्था स्थापन केली. सुमारे दीड हजार सभासदांचा विश्वास संपादन करत सुरुवातीच्या काळात संस्थेची आर्थिक बाजू भक्कम केली. मात्र आगरे याला संस्थेच्या आर्थिक सुबत्तेत सहकाराचा विसर पडून संस्थेच्या पंचविसाव्या वर्षातच स्वाहाकाराच्या प्रेमात पडले. शेतमजुरी करून घरचा चरितार्थ चालविताना स्वत:च्या पोटाला चिमटा घेत मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी कष्टाच्या मजुरीतून थोडी थोडी पुंजी साठवून राजीव पतसंस्थेत ठेवी ठेवणाऱ्यांची संख्या शेकडो आहेत.
मात्र ठेवीदारांच्या ठेवीवर, सोने जिन्नसवर संस्थाचालकांनी ताव मारत गोरगरीब ठेवीदारांना भिकेकंगाल केले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव आगरे यांनी आपला मुलगा शैलेंद्र याला २०१६ साली संचालक मंडळात घेऊन खऱ्या अर्थाने स्वाहाकाराला सुरुवात झाली. संस्थेवर सध्या प्रशासक असून लेखापरीक्षण करण्यात आले. यामध्ये ठेव पावतीवर बनावट कर्ज काढणे, बनावट सोने गहाण, बनावट कागदपत्रे दाखवून कर्ज काढून रक्कम हडप केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लेखापरीक्षक संभाजी शिंदे यांनी संस्थेचे अध्यक्ष आगरे याच्यासह संचालक मंडळ, व्यवस्थापक अशा एकूण १२ जणांविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.