Kolhapur: गर्भपाताच्या साडेचार लाखांच्या गोळ्या जप्त, सांगली येथे करवीर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:56 PM2024-05-24T12:56:06+5:302024-05-24T12:57:32+5:30
वितरक सुनील मळगे याला अटक
कोल्हापूर : गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध साठा करून विक्रेत्यांना त्याचा पुरवठा करणारा वितरक सुनील मल्लिनाथ मळगे (व ४९, रा. सांगलीवाडी, सांगली) याला करवीर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (दि.२३) त्याच्या सांगलीवाडी येथील घराची झडती घेतली असता, सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे ९४६ गोळ्यांचे किट पोलिसांनी जप्त केले. अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा तपास करताना प्रथमच पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सापडला.
करवीर तालुक्यात ठिकठिकाणी अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या टोळीचा तपास करताना करवीर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारा संशयित हाती लागताच गोळ्यांच्या वितरकापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. सांगलीवाडी येथील सुनील मळगे याच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा होत असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली. गुरुवारी त्याच्या घराची झडती घेतली असता, ९४६ गोळ्यांचे किट पोलिसांना सापडले. सुमारे साडेचार लाखांच्या गोळ्यांचा साठा जप्त करून पोलिसांनी पंचनामा केला. त्याची अधिक चौकशी सुरू असून, त्याने कोणाकडून गोळ्या आणल्या? कोणाला पुरवठा केला?
कधीपासून त्याचा हा व्यवसाय सुरू आहे? याचा तपास केला जाईल, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युनुस इनामदार यांनी दिली.
सहा आरोपी अटकेत
या गुन्ह्यात पोलिसांनी गेल्या आठवडाभरात बोगस डॉक्टरसह तीन एजंट आणि गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यास अटक केली होती. सुनील मळगे हा या रॅकेटमधील सहावा अटक आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.