साडेचार लाख लिटर अवैध दारू जप्त, कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरातील गुन्हे अन् किती आरोपींना अटक.. वाचा
By उद्धव गोडसे | Updated: December 27, 2024 17:07 IST2024-12-27T17:07:17+5:302024-12-27T17:07:47+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

साडेचार लाख लिटर अवैध दारू जप्त, कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरातील गुन्हे अन् किती आरोपींना अटक.. वाचा
उद्धव गोडसे
कोल्हापूर : बेकायदेशीर दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षभरात जिल्ह्यात साडेचार लाख लिटर अवैध दारू जप्त केली. या कारवाईदरम्यान २ हजार ७१ गुन्हे दाखल करून १९८२ जणांना अटक केली. जप्त केलेल्या दारूमधील ३ कोटी ९७ लाखांची दारू नष्ट करण्यात आली. शासनाचा महसूल बुडवून दारूची तस्करी करणाऱ्यांवर या विभागाची करडी नजर असल्याने कारवायांची संख्या वाढली आहे.
शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये उत्पादन शुल्क विभाग नेहमीच आघाडीवर असतो. त्यामुळे या विभागाकडे अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांचीच नजर असते. दारू आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्मितीचे परवाने देणे, परवाने नूतनीकरण करणे, वाहतूक परवाने, विक्री या सर्व साखळीतून मोठा महसूल जमा होतो.
महसूल वसुली करण्यासोबतच दारूची बेकायदेशीर निर्मिती आणि विक्री रोखण्याचे काम या विभागाकडून नियमित सुरू असते. गोवा बनावटीची दारू स्वस्तात मिळत असल्याने महाराष्ट्र सरकारचा महसूल चुकवून ती छुप्या मार्गाने राज्यात आणणारी अनेक रॅकेट सक्रिय आहेत. त्यावर कारवाया करण्याचे काम या विभागाकडून केले जाते.
सीमाभागात तस्करी जोमात
गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दारूची तस्करी होते. यासाठी चंदगड तालुक्याचा सीमाभाग हॉटस्पॉट आहे. या परिसरात अनेक ठिकाणी शेतातील घरांमध्ये, पोल्ट्री फार्म, गोडाऊनमध्ये दारूचा साठा लपवला जातो. विविध मार्गांनी तो पुढे राजस्थानपर्यंत पाठवला जातो.
३ कोटी ९७ लाखांची दारू नष्ट
जप्त केलेल्या साडेचार लाख लिटर दारूपैकी ३ कोटी ९७ लाख ९७५ लिटर दारू या विभागाने न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केली. उर्वरित दारू नष्ट करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दारूची बेकायदेशीर निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या १९८२ आरोपींवर पुढील कारवाई सुरू आहे. वांरवार या गुन्ह्यात सापडणाऱ्या सराईतांवर कठोर कारवाया केल्या जात आहेत, अशी माहिती उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली.
अशा झाल्या कारवाया
- गुन्हे - २०७१
- अटक आरोपी - १९८२
- जप्त वाहने - १२५
- जप्त दारू - ४ लाख ५० हजार लिटर
- जप्त दारूची किंमत - ४ कोटी ७३ लाख ४ हजार ६९६ रुपये
- नष्ट केलेली दारू - ३ लाख ९७ हजार ९७५ लिटर
उपलब्ध मनुष्यबळ
- मंजूर - १८५
- प्रत्यक्ष उपस्थिती - १४५
- अधीक्षक - १
- उपअधीक्षक - १
- निरीक्षक - १०
- दुय्यम निरीक्षक ४९
- जवान, लिपिक - ८४
दारू विक्रीची दुकाने
- देशी - २३५
- वाइन शॉप - ४२
- परमिटरूम बिअरबार - १०३३
- बिअर शॉपी - २२४
बेकायदेशीर दारूमुळे शासनाचा महसूल बुडतो. तसेच दारू पिणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका असतो. त्यामुळे अशी निर्मिती आणि वाहतूक रोखण्याला प्राधान्य दिले जाते. गेल्या वर्षभरात साडेचार लाख लिटर दारू जप्त करण्याची कामगिरी आमच्या विभागाने केली. - स्नेहलता नरवणे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग