साडे चारशे महसूल कर्मचारी संपावर, रक्तदान आंदोलन करत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:27 PM2019-08-31T15:27:48+5:302019-08-31T15:30:24+5:30
महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन उदासिन आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यातील साडे चारशे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले. रक्तदान आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.
कोल्हापूर : महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन उदासिन आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यातील साडे चारशे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले. रक्तदान आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालयातील वर्ग-३ व वर्ग-४ चे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी एकवटले. या ठिकाणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विलासराव कुरणे, जिल्हाध्यक्ष सुनील देसाई यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
दरम्यान सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील करवीर प्रांताधिकारी कार्यालय येथे शासनाच्या निषेधार्थ आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी झाले. यावेळी बहुतांश कर्मचाºयांनी रक्तदान करुन शासनाच्या उदासिन भूमिकेचा निषेध केला. या संपात एकूण ६५० पैकी ४५० कर्मचारी सहभागी झाले.
उर्वरीत कर्मचारी हे पूराशी संबंधित कामात असल्याने ते सहभागी होऊ शकले नाहीत. या संपामुळे झालेल्या नागरिकांच्या गैरसोयीबद्दल संघटनेतर्फे दिलगिरीही व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर ५ सप्टेंबरपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
आंदोलनात विनायक लुगडे, अकिल शेख, विनायक लुगडे, संदीप पाटील, संतोष वाळके, श्ांकर गुरव, राणी शिरसाट, विद्या शिंदे, दत्ता पाडळकर, सचिन सवळेकरी, अश्विनी कारंडे, नारायण पाटील, विनय बोळके, अजय लुगडे, गणेश जाधव आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.