जागा विक्री फसवणूकप्रकरणी दोन होमगार्डसह चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:23+5:302020-12-17T04:49:23+5:30
रोख रकमेसह तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत मुरगूड : मुंबई येथील विक्रम श्रीपती तांबे यांची खोटी जागा दाखवून सुमारे अडीच ...
रोख रकमेसह तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुरगूड : मुंबई येथील विक्रम श्रीपती तांबे यांची खोटी जागा दाखवून सुमारे अडीच लाख घेऊन पोबारा केलेल्या दोन होमगार्डसह चौघा भामट्यांना मुरगूड पोलिसांनी चोवीस तासांत अटक केली. या चौघांकडून दोन लाख चाळीस हजार रोख रकमेसह दोन मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या. या चौघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार अभय ऊर्फ सरदार बाळासोा सूर्यवंशी (वय ३२, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर), स्वप्निल वसंत कुरणे (२९, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर कोल्हापूर), सनिकेत संजय लुगडे (२६, रा.पाडळी खुर्द ता. करवीर) व नंदकुमार शंकर पाटील (२८, रा. आणदूर, ता. गगनबावडा) यांचा समावेश आहे.
अधिक माहिती अशी यातील अभय ऊर्फ सरदार यांनी विक्रम तांबे यांच्याशी ओळख निर्माण करून मुरगूडमध्ये आपणासाठी घर बांधण्यासाठी जागा आहे, असे सांगितले होते. त्यानुसार तेरा डिसेंबरला तांबे हे आपल्या भाच्यासह मुरगूड येथे जागा खरेदीसाठी आगाऊ रक्कम म्हणून सुमारे दोन लाख साठ हजार घेऊन आले होते.
अभय ऊर्फ सरदार याने स्वप्निल कुरणे याला जमिनीचा खोटा मालक म्हणून मुरगूडमध्ये अगोदरच उपस्थित राहण्यास सांगितले होते. तांबे यांना घेऊन १३ तारखेला अभयने मुरगूड येथील भडगाव रस्त्यावरील रिकामी जागा स्वप्निल कुरणेच्याच मालकीची आहे, असे सांगितले चर्चा झाल्यानंतर आगाऊ रक्कम म्हणून दोन लाख चाळीस हजार रुपये स्वप्निलकडे दिले आणि करारपत्र करण्यासाठी ते स्टँडकडे जाऊ लागले. इतक्यात सनिकेत लुगडे व नंदकुमार पाटील हे दोन तरुण होमगार्डचा पोलिसांच्यासारखी दिसणारे कपडे घालून मोटारसायकलवरून तिथे आली. त्यांनी ठरल्याप्रमाणे अभयला मारहाण करत गाडीवर घालून नेले.
तांबे यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आणि त्यांना हॉटेलमध्ये भेटलेल्या नात्यातील युवतीकडे अधिक तपास करून यातील दोघांना घरातून तर अन्य दोघांना कोल्हापुरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या तपासात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डी.वाय.एस.पी. डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनानुसार सपोनि विकास बडवे, प्रशांत गोजारे, रमेश शेंडगे, राम पाडळकर, स्वप्निल मोरे, सुदर्शन पाटील, आनंदा कुंभार,आनंदा भोईटे यांनी काम केले.
फोटो ओळ :- मुंबई येथील इसमास खोटी जागा दाखवून फसवणूक करणाऱ्या चौघा युवकांना मुरगूड पोलिसांनी अटक केली. आरोपींसह सपोनि विकास बडवे व पोलीस कर्मचारी.