कोल्हापुरातील व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून लूटणाऱ्या चौघांना अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:44 PM2024-08-21T12:44:56+5:302024-08-21T12:45:17+5:30
पैसे जमा करण्यासाठी येणाराच लुटीचा सूत्रधार : पाचगावातील बारमध्ये बसून रचला कट
कोल्हापूर : साईक्स एक्स्टेंशन येथील गजलता आर्केडमधील व्यावसायिकाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यास पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत १३ लाख २९ हजार ४०० रुपयांची लूट करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. १९) रात्री चौघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील ११ लाख ३५ हजार रुपयांची रोकड, एक कार, एक पिकअप टेम्पो, मोपेड, तीन मोबाइल, पिस्तूल, चाकू असा सुमारे ३२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
अभिषेक विजय कागले (वय ३१, रा. युवराज कॉलनी, पाचगाव), आशिष नीळकंठ कागले (३७, रा. ऋषिकेश कॉलनी, पाचगाव), बाळकृष्ण श्रीकांत जाधव (३५, रा. पाचगाव) आणि अमरजित अशोक लाड (४१, रा. लाइन बाजार, कसबा बावडा) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १७) दुपारी सव्वादोन ते अडीचच्या दरम्यान झालेल्या लूटमारीचा तपास शाहूपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या आठ पथकांनी केला. गुन्ह्यात वापरलेल्या मोपेडचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित मार्केट यार्ड येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ गेल्याचे दिसले. त्याठिकाणी मोपेड एका पिकअपमध्ये ठेवून ते कारमधून पुढे गोव्याला गेले. वाहनांच्या नंबरवरून संशयितांची माहिती मिळताच पथकांनी शोध गतिमान केला. गोव्याहून नुकतेच परत आलेले संशयित सोमवारी रात्री पाचगाव आणि कसबा बावडा येथे पोलिसांच्या हाती लागले.
पैसे जमा करणारा लाड सूत्रधार
शिरोली पुलाची येथील एका दुकानात काम करणारा अमरजीत लाड हा नेहमी गजलता आर्केड येथील कार्यालयात पैसे जमा करण्यासाठी जात होता. शनिवारी दुपारी ४ लाख २९ हजार ४०० रुपयांची रक्कम तो कार्यालयात जमा करून बाहेर पडला. मोठी रक्कम जमा झाल्याची खात्री पटताच त्याने कागले बंधू आणि जाधव या मित्रांना फोन करून लूट करण्यास सांगितले.
बारमध्ये बसून रचला कट
पाचगाव येथील राजयोग बारमध्ये शुक्रवारी दुपारी कागले बंधू आणि जाधव हे तिघे दारू पित बसले होते. त्याचवेळी त्यांनी लाड याच्या सांगण्यावरून लूटमारीचा कट रचला. त्यानंतर उद्यमनगर येथून पाच हजार रुपयांचे एअर पिस्टल आणि १०० रुपयांचा चाकू, कापडी मास्क, चिकटटेप खरेदी केला. अभिषेक कागले याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्याचा चुलत भाऊ आशिष हा दुकानात मदत करतो.
गोव्यात उडवले दीड लाख
लूटमार करताच चौघे कारने थेट गोव्यात पोहोचले. दोन दिवसांत त्यांनी कॅसिनोमध्ये दीड लाख रुपये उडवले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. कोल्हापुरात पोहोचताच ते पोलिसांच्या हाती लागले.
कर्जफेडीसाठी कट
लूटमारीचा कट रचणारा लाड हा बांधकाम साहित्य विक्रीच्या दुकानात काम करतो. त्याच्यावर चार लाखांचे कर्ज आहे. कर्जफेडीसाठी आणि मौजमजा करण्यासाठी लूटमारीचा कट रचल्याचे त्यांने पोलिसांना सांगितले. व्यावसायिक ललित बन्सल यांच्या कार्यालयात मोठी रक्कम जमा होते. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. भीतीपोटी मालक पोलिसांत फिर्याद देणार नाही, असा चोरट्यांचा समज होता.
यांनी लावला छडा
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि उपअधीक्षक अजित टिके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, शाहूपुरीचे निरीक्षक अजय सिंदकर, सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे, उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे यांच्यासह सहायक फौजदार संदीप जाधव, अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, विजय इंगळे, अमित सर्जे, रोहित मर्दाने, आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.