कोल्हापुरात ‘हनीट्रॅप’प्रकरणी चौघे जेरबंद, बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, मोहजालात अडकवायचे आणि नंतर लुटायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 10:57 AM2021-12-17T10:57:16+5:302021-12-17T11:01:47+5:30
बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, त्यांना महिला अथवा तरुणाच्या मोहजालात अडकवायचे आणि नंतर या गुंडांच्या टोळीकडून पैशासाठी लुटायचे
कोल्हापूर : मैत्रीचा बहाणा करुन ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून एका व्यापाऱ्याला अडीच लाखाला लुटल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी टोळीतील चौघांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.
म्होरक्या सागर पांडुरंग माने (वय ३२, रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा) याच्यासह विजय यशवंत मोरे (३६, रा. व्हन्नूर, ता. कागल), फारुख बाबासाहेब शेख (३२, रा. महाराणा प्रताप चौक), विजय ऊर्फ पिंटू शंकर कुलकुटगी (३९, रा. दौलतनगर, राजारामपुरी) अशी अटक केलेल्या टोळीतील चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, त्यांना महिला अथवा तरुणाच्या मोहजालात अडकवायचे आणि नंतर या गुंडांच्या टोळीकडून पैशासाठी लुटायचे अशा पध्दतीने ‘हनीट्रॅप’ करून व्यापाऱ्यांना लुबाडणाऱ्या तीन टोळ्यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पर्दाफाश केला आहे.
एका बड्या व्यापाऱ्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हद्दीत अशाच पध्दतीने महिलेला पुढे करुन ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून लुबाडल्याचे उघड झाले आहे. त्या व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करुन त्याच्यावर बलात्काराची केस नोंदवण्याची धमकी देत अडीच लाख रुपयांना लुबाडले. त्याने लक्ष्मीपुरी पोलिसांत दि. २७ नोव्हेंबरला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सागर माने, विजय मोरे, फारुख शेख, विजय ऊर्फ पिंटू कलगुडगी या चौघांच्या टोळीला अटक केली.
याच टोळीने इतर ठिकाणीही अनेक व्यापाऱ्यांना लुटल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना इतरही पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून या चौघांचा लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताबा घेऊन अटक केली. चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत.
सहा हनी ट्रॅप
गुंडांच्या टोळ्यांना ‘हनीट्रॅप’मध्ये गुंतवून व्यापाऱ्यांची आर्थिक लुबाडणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बदनामीच्या भीतीने अद्याप अनेक व्यापाऱ्यांनी तक्रारी दिलेल्या नाहीत. आतापर्यंत लक्ष्मीपुरीसह जुना राजवाडा, शाहुपूरी, शिरोली एमआयडीसी, कागल, गोकुळ शिरगाव या पोलीस स्टेशनमध्ये ‘हनीट्रॅप’प्रकरणी व्यापाऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत.