शिकार करणाऱ्या चौघांना अटक
By admin | Published: October 20, 2016 02:40 AM2016-10-20T02:40:36+5:302016-10-20T02:40:36+5:30
तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोहका वन कक्ष क्रमाक ३९८ च्या राखीव जंगलात रानडुकराची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणाऱ्या
रानडुक्कर मारले : कोहका जंगल परिसरातील घटना; वन विभागाने केली कारवाई
कुरखेडा : तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोहका वन कक्ष क्रमाक ३९८ च्या राखीव जंगलात रानडुकराची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणाऱ्या चार आरोपींना रानडुकराच्या मांसासह वनाधिकाऱ्यांनी अटक केल्याची घटना बुधवारी घडली. सदर चारही आरोपींना कुरखेडा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणातील श्यामलाल बोगा (४२) रा. कोहका, बरन मडावी (४५), गेंदलाल नैताम (४०), ईश्वर कुमरे (३५) तिघेही रा. कोटगूल अशी आरोपींची नावे आहेत. कोरची तालुक्यातील कोटगल जवळील कोहका वनकक्ष ३९८ च्या राखीव जंगलालगत शेतात विद्युत तार लावून श्यामलाल बोगा, बरन मडावी, गेंदलाल नैताम, ईश्वर कुमरे या चौघांनी १८ आॅक्टोबर रोजी मंगळवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास वीज ताराने फास लावून रानडुकराची शिकार केली. सदर माहिती कोटगूल पोलीस केंद्राला मिळताच त्यांनी ही माहिती मालेवाडाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिली. तत्काळ वनपरिक्षेत्राधिकारी डी. आर. कोरेवार, क्षेत्रसहाय्यक एम. ए. पठाण, व्ही. एम. तुमराम, वनरक्षक के. जे. कुमरे, लाकडे, उमरे, रामटेके, नाकाडे, चौधरी, कुमोटी, शेख, ठाकरे, कोथडे, साखरे, खोब्रागडे, राऊत, गोनाडे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व चारही आरोपींना रानडुकराच्या मांसासह अटक केली. आरोपींच्या विरोेधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९, ५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बुधवारी कुरखेडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले असता, न्यायालयाने सर्व चारही आरोपींना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)