आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रातील २० बॅँकांत दरोड्याची दिली कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 01:15 PM2020-01-30T13:15:53+5:302020-01-30T13:16:44+5:30
त्यांनी आतापर्यंत २० बँकांवर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, १५ जिवंत काडतुसे, रोकड व स्कॉर्पिओ असा सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या कळे (ता. पन्हाळा) शाखेवर दरोडा टाकणाऱ्या गुळव्यासह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगली फाटा ते गांधीनगर फाटा परिसरात सापळा रचून अटक केली. संशयित म्होरक्या बाबू कौसर खान (वय ४६), फसाहत ऊर्फ तहलीबआलम कल्लू खान (३६), नवाजिश ननसार अली (३४), गुड्डू इश्तयाक अली (४४, सर्व रा. ककराला-उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांनी आतापर्यंत २० बँकांवर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, १५ जिवंत काडतुसे, रोकड व स्कॉर्पिओ असा सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्होरक्या बाबू खान याने कळे परिसरातील एका गुºहाळघरावर दोन वर्षांपूर्वी आठ महिने गुळव्याचे काम केले होते. या कालावधीत त्याने कळे येथील दोन बँकांची टेहळणी केली होती. सुरक्षारक्षक नसलेल्या सहकारी बँका लक्ष्य करून, त्यांच्यावर दरोडा टाकण्याचे काम ही टोळी करीत होती. उत्तरप्रदेशमधील ककराला हे चोरट्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. टोळीतील संशयित चाँदखान नईमखान हा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करतो. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू असे भाडे तो घेत असतो. त्याचा भाऊ गुड्डू नईमखान हा ककरालामध्ये राहतो. हे दोघेही गुळव्या बाबूखान याच्या टोळीमध्ये सक्रिय असत.
बाबूने या दोघांना आपण कोल्हापुरातील कळे बँकेवर दरोडा टाकायचा असल्याचे सांगितले. त्यानुसार चाँदखानने उत्तराखंडमधून गाद्यांची डिलिव्हरी घेतली. गाद्या ट्रकमध्ये भरून त्या कर्नाटकात दिल्या. तेथून बाबूसह सातजण ५ फेब्रुवारी २०१९ रोजी कोल्हापुरात आले. कळे परिसरात रस्त्याकडेला ट्रक लावून त्यांनी येथील दोन्ही बँकांची पुन्हा टेहळणी केली. त्यानंतर ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी यशवंत बँकेवर दरोडा टाकला. जाताना ते कळे, कोल्हापूर शहरातून राष्ट्रीय महामार्गाने मुंबईला गेले होते.
म्होरक्या बाबू हा आपल्या तीन साथीदारांसोबत स्कॉर्पिओमधून सांगली फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने शोध घेतला असता महामार्गावर एका फर्निचरच्या दुकानाच्या मोकळ्या जागेत पांढºया रंगाची गाडी (एमएच ४५ एन ३७४३) दिसून आली. त्यामध्ये चौघेजण बसलेले निदर्शनास आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.
अंगझडतीमध्ये बाबू खान व फसाहत खान यांच्या कमरेला प्रत्येकी एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे मिळून आली. बॅगेमध्ये दहा रुपयांची नाणी असलेले ६ हजार ८६० रुपये व पाच रुपयांची ४ हजार ९३५ कॉईन असे ९३ हजार २७५ रुपये मिळून आले.
या चौघांसह साथीदार जाफर तसव्वर अली, असलम ऊर्फ महंमद सफीक ऊर्फ मिठोरी खान (सर्व रा. बदायूँ, उत्तरप्रदेश), संतोष हरी कदम, अमोल महादेव बागल, मंगेश धनाजी गोरे, सचिन अरुण शिंदे (सर्व, रा. माढा, जि. सोलापूर), सविता संतोष हटकर (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी मिळून आंध्रप्रदेशमधील मामीदिकुद्रू येथील एसबीआय बँकेत दरोडा टाकून कॉईन चोरल्याची कबुली दिली. चोरी करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर परिसरात आले होते. त्यांनी तमिळनाडू राज्यातील अनिचिट्टी, कर्नाटकातील खानापूर, बेळगाव अशा सुमारे २० बँकांवर दरोडा टाकला आहे.
ट्रकला आणि कारलाच घर बनविले
बाबू खान हा टेहळणी करून बँकेची निवड करतो. गुड्डू कालिया हा गॅस कटिंग व लोखंडी लॉकर तोडण्याचे काम करतो. आॅक्सिजन गॅस सिलिंडरची चोरी त्यांनी कर्नाटकातून केली आहे. त्याचा वापर ते दरोड्यासाठी करीत. संशयित मोबाईलचा वापर करीत नव्हते. ते देशभर फिरत असताना हॉटेल, लॉजमध्ये राहत नव्हते. ट्रकमध्येच जेवण बनविणे, नदी, विहिरीवर अंघोळ करणे, झोपणे यांसाठी त्यांनी ट्रकलाच घर बनविले होते. टोळीतील सर्व संशयित सराईत गुन्हेगार आहेत. सर्वांची लग्ने झाली असून, पत्नी, मुले, आई-वडील आहेत. सात ते आठ महिने ते बाहेर राहतात.
यशवंत सहकारी बँकेच्या कळे (ता. पन्हाळा) शाखेवर दरोडा टाकणाºया चोरट्यांकडून जप्त केलेला मुद्देमाल. (छाया : नसीर अत्तार)