सांगलीतील व्यापा-याला गंडा घातलेले चौघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:23 AM2021-03-21T04:23:41+5:302021-03-21T04:23:41+5:30
कोल्हापूर : एक कोटी रुपये कर्जाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील शेती आणि केमिकल ऑईल सप्लायर्स व्यापा-याला फिल्मी स्टाईलने २० ...
कोल्हापूर : एक कोटी रुपये कर्जाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील शेती आणि केमिकल ऑईल सप्लायर्स व्यापा-याला फिल्मी स्टाईलने २० लाखांचा गंडा घातल्या प्रकरणाचा शाहुपुरी पोलिसांनी अवघ्या १५ दिवसात पर्दाफाश केला. चौघा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून १५ लाखांची रोकड जप्त केली. याचा मुख्य सूत्रधार शिवाजी लक्ष्मण शेळके (वय ४६) याच्यासह तोतया पोलीस संदीप ज्ञानदेव लाड (३२), राजू शिवाजी मिसाळ (३८ , तिघे रा. सातार्डे, पन्हाळा) व साथीदार भीमराव मारुती लाड (५४, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दि. २३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली.
फसवणूक झालेले अनिल विश्वासराव पाटील (रा. येळावी, ता. तासगाव, जि. सांगली) हे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असून सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष स्नेहल पाटील यांचे पती होय. यामुळे या फसवणुकीबाबत पोलीस वर्तुळातून कमालीची गोपनीयता पाळली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल पाटील यांना व्यवसायासाठी पैशाची गरज होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या भामट्याने १ कोटी रुपये कर्ज कमी व्याजदरात मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांना किमान २० लाखांची अनामत रक्कम ठेवावी लागेल असे सांगितले होते. टोळीतील सूत्रधार शिवाजी शेळके याने त्यांना दि. ४ मार्च रोजी कोल्हापुरात तावडे हॉटेल परिसरात बोलवले. त्यावेळी शेळके हा आपल्या साथीदारांसह तेथे पोहचला. शेळके याने साथीदाराला ही २० लाखांची रक्कम घेऊन जा व कर्जाची १ कोटीची रक्कम लवकर घेऊन ये, असे सांगितले. तसा तो पैसे घेऊन गेल्यानंतर दोघे पोलीस गणवेशातील तोतया पोलीस तेथे आले. त्यांनी प्रथम शेळके याला ताब्यात घेतल्याचा बहाणा करत तेथून निसटले. चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने त्यांनी हे नाट्य घडवले. नंतर अनिल पाटील यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. त्यांनी शाहुपुरी पोलिसात तक्रार दिली. शाहुपुरी पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या फसवणूक नाट्याचा हा तपास कौशल्याने करत उघडकीस आणला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुपुरी पोलीस ठाण्यातील परशुराम कोरके, कर्मचारी दिग्विजय चौगले, अनिल पाटील, दिगंबर पाटील, शुभम संकपाळ, सुशील सावंत, जगदीश बामणीकर यांनी केली.
पोलिसांची वेषांतर करून संशयितांवर पाळत
टोळीने बनावट नावाचा वापर केला. सूत्रधार शेळके याने बरवराज पाटील (रा. दूधगाव) व विजय पाटील (रा. सावंतवाडी) अशा बनावट नावांसह परराज्यातील मोबाईल सीम कार्डचा वापर केल्याची माहिती चौकशीत पुढे आली. शाहुपुरीतील कॉन्स्टेबल दिग्विजय चौगले यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गोपनीय माहिती जमा केली. त्यात संशयित सूत्रधार शिवाजी शेळके याचे खरे रूप व नाव स्पष्ट झाले. पोलीस पथकाने वेषांतर करून सातार्डे (ता. पन्हाळा) या संशयिताच्या गावातील घरी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने संशयित संदीप लाड, राजू मिसाळ, भीमराव लाड या साथीदारांच्या मदतीने हे फसवणुकीचे कृत्य केल्याची कबुली दिली. त्यामुळे सर्वांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोकड जप्त केली.
फोटो नं. २००३२०२१-कोल-कॅश
ओळ : सांगलीतील व्यावसायिकाला २० लाखाला गंडा घातल्याप्रकरणी कोल्हापुरात शाहुपुरी पोलिसांनी अटक केलेल्या चौघा संशयितांकडून जप्त केलेली १५ लाखांची रोकड.