कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून चौघे इच्छुक, हसन मुश्रीफांनी दिली माहिती
By राजाराम लोंढे | Published: December 3, 2022 07:53 PM2022-12-03T19:53:56+5:302022-12-03T20:01:03+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षाचा कालावधी असला तरी जोरदार तयारी सुरु
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौघे इच्छुक आहेत. इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके हेही आपणास भेटले आहेत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील हेही इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षाचा कालावधी असला तरी भाजपने मतदारसंघ निहाय जोरदार तयारी केली आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या (दोन्ही गट) पातळीवर सध्या शांतता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली गतीमान झाल्या आहेत. आघाडीमध्ये कोणता मतदार संघ कोणाला जाईल, याचा ठोकताळा बांधून तयारी सुरु आहे.
‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन नरके इच्छुक असल्याची घोषणा केली. याबाबत आमदार मुश्रीफ म्हणाले, चेतन नरके हे माझ्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही उमेदवारीबाबत भेटले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अरुण नरके हे भेट घेणार असल्याचे समजते. त्यांच्यासह चौघेजण लढण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये व्ही. बी. पाटीलही असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
‘ए. वाय.’ आता तरी आमच्यासोबत
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या संभाव्य बंडाबाबत विचारले असता, आता आमच्यासोबत आहेत ना, त्यामुळे चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. तुम्ही काळजी करु नका, असे मुश्रीफ यांनी सांगितले