जिल्ह्यातील भाजपचे चारही आमदार ‘सलाईन’वर
By admin | Published: November 3, 2014 11:16 PM2014-11-03T23:16:17+5:302014-11-03T23:28:54+5:30
प्रश्न मंत्रीपदाचा : कोणालाही स्पष्ट संकेत नाहीत; आयाराम व निष्ठावंतांमध्ये नवे राजकारण
सांगली : काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून लोकसभेची एक व विधानसभेच्या चार जागा जिंकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील भाजपला पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात तरी आता मंत्रीपद मिळणार की नाही, याची चिंता भाजप कार्यकर्त्यांना लागली आहे. भाजपच्या चारही आमदारांना मंत्रीपदाची आशा असून, यातील एकालाही मंत्रीपदासाठी स्पष्ट संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे आमदार व त्यांचे समर्थक सध्या ‘सलाईन’वर आहेत. त्यातच मंत्रीपदावरून आता जिल्ह्यातील आयाराम व निष्ठावंत गटातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे.
जिल्ह्यातील कॉँग्रेस व राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देऊन भाजपने स्थान भक्कम केले आहे. लोकसभेची एक जागा विक्रमी मताधिक्याने जिंकण्यासह जिल्ह्यातील विधानसभेच्या पन्नास टक्के जागांवर कब्जा करण्यात भाजपला यश मिळाले. या यशात आयारामांसह भाजपच्या निष्ठावंत गटाचाही वाटा आहे. दोन्ही कॉँग्रेसला धूळ चारून यश मिळवल्यामुळे जिल्ह्याला किमान दोन मंत्रीपदे मिळतील, अशी अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांसह काही मोजक्याच मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ््यात सांगलीच्या एकाचा समावेश असेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. या सर्व शक्यतांना, चर्चेला पूर्णविराम देत सांगलीला डावलण्यात आले.
दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या काळापासून जिल्ह्याचा मंत्रिमंडळात मोठा दबदबा राहिला आहे. प्रत्येकवेळी मंत्रीपदाच्या शर्यतीत जिल्ह्यातील राजकारण्यांनी आघाडी घेतली. गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधित राज्यातील मंत्रिमंडळात तीन मंत्रीपदे जिल्ह्याकडे कायम राहिली. त्याशिवाय महामंडळांवरही सांगलीकरांची वर्णी लागत राहिली. यंदा या परंपरेला छेद मिळणार की परंपरा कायम राखली जाणार, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात व्यक्तिगत राजकारण
रंगले...
मंत्रीपदाचे राजकारण सांगलीला नवीन नाही. एकमेकांच्या पायात पाय घालण्याचीही परंपरा सांगलीत पूर्वापार चालत आली आहे. भाजप सरकारमध्येही सध्या मंत्रीपदासाठी दावेदार असलेल्या जिल्ह्यातील आमदारांना असाच अनुभव येत आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेले शिवाजीराव नाईक यांचा समावेश मंत्रिमंडळात होऊ नये म्हणून जिल्ह्यातील एका माजी मंत्र्याने ताकद पणाला लावली आहे. त्यांच्या ताकदीला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांचाही हातभार लागला आहे. दुसरीकडे सुरेश खाडे हेसुद्धा मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना कोणाचाही अडथळा नाही. या विचित्र राजकारणात नव्याने आमदार झालेल्या सांगलीच्या सुधीर गाडगीळ व विलासराव जगताप यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते.
अजिल्ह्याला किती मंत्रीपदे मिळणार, हा उत्सुकतेचा विषय असतानाच महामंडळे व विधानपरिषदांच्या जागांवर आता सांगलीतील काही नेत्यांचा डोळा आहे. आघाडी सरकारच्या कालावधित जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्रीपदे, दोन महामंडळांचे अध्यक्षपद जिल्ह्याकडे होते. त्या प्रमाणात जिल्ह्यातील भाजपची दावेदारी सुरू झाली आहे. मंत्रीपदे कमी मिळाली तर, भाजपचे अन्य नेते, आमदार यांच्याकडून महामंडळांवर दावा केला जाणार आहे. काहींना विधानपरिषदेची आमदारकीही हवी आहे. मंत्रीपदे कमी मिळाली तर, उर्वरित आमदारांपैकी काहींची महामंडळावर वर्णी लागू शकते.यासाठी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे यांची दावेदारी आहे.
जिल्ह्याची परंपरा कायम राहणार का?
जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांनी तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. राजारामबापू पाटील, बॅ. जी. डी. पाटील, शालिनीताई पाटील, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव शेंडगे, अण्णा डांगे, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, आर. आर. पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील यांनी मंत्रीपद भूषवले आहे. प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रीपदाचा मानही जिल्ह्याला मिळाला होता. त्यामुळे मंत्रीपदाची ही परंपरा किती प्रमाणात आता भाजप सरकारच्या कालावधित राखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महामंडळांची पदे आणि पक्षीय प्रदेशाध्यक्षपदांबाबतही जिल्हा राज्याच्या राजकारणात आघाडीवर राहिला आहे. यंदा सांगलीच्या पदरात फारशी पदे पडणार नाहीत, अशीच चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदारांसह निष्ठावंत म्हणून काम करणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे.