चार घरफोड्यांना अटक
By admin | Published: April 26, 2015 01:18 AM2015-04-26T01:18:25+5:302015-04-26T01:18:25+5:30
दहा घरफोड्या उघडकीस : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गांधीनगर : गांधीनगरच्या पोलिसांनी दहा घरफोड्या उघडकीस आणून चार चोरट्यांना जेरबंद केले. त्या चोरट्यांकडून १९ तोळे सोने, एक किलो चांदी, एक मोटारसायकल व मोबाईल हॅण्डसेट असा चार लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव व सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मलू सिद्धू चव्हाण, सिद्धू बाळू चव्हाण (दोघे रा. शांतीनगर, उचगाव, ता. करवीर), राजू पैजल काळे (रा. इचलकरंजी), शिवाजी उत्तम काळे (रा. गडमुडशिंगी, ता. कागल) अशी चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांनी करवीर पूर्व भागात धुमाकूळ घातला होता. गडमुडशिंगी, चिंचवाड, गांधीनगर, उचगाव, मणेरमळा या परिसरात पकडलेल्या चोरट्यांनी दहा घरफोड्या केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये झालेल्या चोऱ्यांचा गांधीनगरचे स. पो. नि. संभाजी गायकवाड, पो. उपनिरीक्षक राम गोमारे, पो. हवालदार कृष्णात पिंगळे, प्रदीप जाधव, रमेश धादवड, नारायण गावडे, राकेश माने, अमित सुळगावकर, शशिकांत पाटील यांनी तपास करून चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
सिकंदर चाँदसाब मुजावर, रुद्राप्पा बसव कुंभार (रा. मणेरमळा), श्रीकांत विश्वास राणे, अशोक दादू माने, अभिजित राजन परदेशी, पोपट दिनकर माने, किरण उद्धव पवार (सर्व रा. उचगाव), विक्रमसिंह बबनराव पाटील (रा. चिंचवाड), दत्तात्रय विलास चव्हाण, राजेंद्र बाबूराव पाटील (रा. गडमुडशिंगी) अशा दहाजणांची घरे फोडल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती अमरसिंह जाधव यांनी दिली. (वार्ताहर)