नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेद्वारे चार कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 02:51 PM2019-12-04T14:51:30+5:302019-12-04T14:52:28+5:30
कोल्हापूरातील युवकांनी ‘नो शेव्ह नोव्हबर’ या उपक्रमा अंतर्गत महिनाभर दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून साठलेली रक्कमेतून बुधवारी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आली. कोल्हापुर प्रेस क्लब कार्यालय येथे किरण गीते यांच्या हस्ते ही रक्कम नातेवाईकांना देण्यात आली.
कोल्हापूर : कोल्हापूरातील युवकांनी ‘नो शेव्ह नोव्हबर’ या उपक्रमा अंतर्गत महिनाभर दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून साठलेली रक्कमेतून बुधवारी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आली. कोल्हापुर प्रेस क्लब कार्यालय येथे किरण गीते यांच्या हस्ते ही रक्कम नातेवाईकांना देण्यात आली.
जगभरात नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम सुरू असते याचेच अनुकरण कोल्हापुरातील दर्शन शहा आणि शेखर पाटील यांनी गेल्या वर्षी पासून सुरू केली. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला कोल्हापुरातील दोनशेहून अधिक तरुणांनी पाठिंबा दिला. याअंतर्गत महिनाभर दाढी केली गेली नाही. दाढी करण्यासाठी जेवढे पैसे खर्च होतात ते वाचवून ती रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आपण ही मोहीम सुरू करू असा निर्णय सर्वांनी केला. त्यानुसार यंदा सलग दुसर्या वर्षी ही मोहीम अगदी उत्साहाने राबविण्यात आली.विशेष म्हणजे यावर्षी परभणीमधील किरण गीते या युवतीच्या हस्ते जमा झालेली रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. किरण गीते या युवतीने काही दिवसांपूर्वीच स्वत:चे केस कन्सरग्रस्त महिलेसाठी दान केले आहेत. तिच्या कार्याची दखल घेऊन नो शेव्ह नोव्हेंबर ग्रुपकडून तिला निमंत्रित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू झाली असल्याने सोशल मीडियाचा असाही वापर करणारे तरुण समाजात आहेत, हे या उपक्रमाद्वारे दाखवून दिले आहे. तरुणांनी ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली आहे याचे खुप कौतुक वाटत असल्याच्या भावना काही कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, सचिव मनजीत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली.
४०० जणांचा सहभाग...
यावर्षी ४०० हून अधिक तरुण मोहिमेत सक्रिय झालेत. ग्रुपच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक रक्कम सोशल मीडियाच्या माध्यमातून गोळा करण्यात आली. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना ही जमा देण्यात आली.