विभक्त होण्याच्या मार्गावर असलेली 4 जोडपी पुन्हा रमली संसारात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 07:56 PM2017-08-20T19:56:24+5:302017-08-20T19:56:55+5:30
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत कोल्हापूर येथे जनसुनावणी घेण्यात आली.
कोल्हापूर, दि. 20 - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत कोल्हापूर येथे जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाकडे दाखल असलेल्या ३५ तसेच २५ नव्या तक्रारी अशा एकूण ६० तक्रारीवर सुनावणी घेण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, वकील, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला बाल विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ४ जिल्ह्यातील दाखल तक्रारींची सुनावणी, समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभक्त होण्याचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांचे समुपदेशन यावेळी करण्यात आले. यातील ४ जोडपी पुन्हा एकमताने संसारात रमली आहेत.
महिला आयोग आपल्या दारी मंगळवारी पुण्यात'
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयन्त करत आहे. महिलांना न्याय मिळावा यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर येथे आयोजित सुनावणीत ४ जिल्ह्यातील ६० तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर आता २२ ऑगस्ट रोजी या संकल्पनेअंतर्गत आयोगाकडे दाखल असलेल्या पुणे जिल्ह्यातील तक्रारींची सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. याच बरोबर नव्याने आलेल्या तक्रारींवर ही कार्यवाही करण्यात येणार आहे. सुनावणी, तक्रारीसाठी मुंबई कार्यालयात येणं शक्य नसलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अल्पबचत भवन, राणीचा बाग रोड, कौन्सिल हॉल जवळ, पुणे येथे दुपारी 1 वाजता दाखल तक्रारीची सुनावणी आणि नव्या तक्रारी यावर कार्यवाही होणार आहे.