इमारतीस सुरुवात नसताना सजावटीसाठी चार कोटी : इचलकरंजी नगरपालिका सभेत मंजुरी विरोधकांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:57 AM2018-03-29T00:57:41+5:302018-03-29T00:57:41+5:30
इचलकरंजी : नगरपालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बांधण्यात येणाºया सभागृहाऐवजी अन्य प्रकारची बांधकामे करण्यात आली. अद्यापही सभागृहाची इमारत बांधण्यास सुरुवात झाली नसताना चार कोटी रुपयांचे अंतर्गत सजावट
इचलकरंजी : नगरपालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बांधण्यात येणाºया सभागृहाऐवजी अन्य प्रकारची बांधकामे करण्यात आली. अद्यापही सभागृहाची इमारत बांधण्यास सुरुवात झाली नसताना चार कोटी रुपयांचे अंतर्गत सजावट व फर्निचर घेण्याच्या विषयास विरोधकांनी केलेला जोरदार विरोध डावलत सत्तारूढ आघाडीने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. विविध अशा ४८ विषयांवर बुधवारच्या नगरपालिका सभेत निर्णय घेण्यात आले.
सभा नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरपालिकेच्या दुसºया मजल्यावर स्थायी समिती कक्ष व सभागृहाचे इंटेरिअर वर्क करण्यासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळालेल्या पाच कोटी रुपये अनुदानापैकी चार कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाचा विचार करणे, हा विषय सभेच्या पटलावर येताच विरोधी आघाडीचे उदयसिंह पाटील, विठ्ठल चोपडे, शशांक बावचकर, संजय कांबळे, आदींनी बांधकामाचा पत्ता नसलेल्या सभागृहासाठी चार कोटींचे फर्निचर आताच खरेदीची घाई का? असा प्रश्न विचारत जोरदार टीका केली.
मात्र, सत्तारूढ आघाडीकडून तानाजी पोवार, अजित जाधव, सागर चाळके, अशोक जांभळे यांनी आताच इंटेरिअल तरतूद केली पाहिजे, असा आग्रह धरला. यावेळी सत्तारूढ व विरोधकांत जोरदार खडाजंगी उडाली. तरीही हा विषय सत्तारूढांनी २४ विरुद्ध १७ मतांनी मंजूर केला.पालिकेकडे प्रभारी आरोग्य अधिकारी असलेल्या डॉ. अशोक महाजन यांनी कार्यमुक्ती मागवून डॉ. आंबेडकर हॉस्पिटलकडे बदली मागितली आहे. या विषयावर बोलताना विरोधी पक्षाबरोबरच सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनीही जोरात विरोध दर्शविला. या पदासाठी इच्छुक असलेल्या डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना पालिकेच्या सभेत आयजीएम रुग्णालयाकडे पाठविण्याचा एकमताचा प्रस्ताव संमत झाला असताना सुद्धा ते अद्यापही नगरपालिकेच्या सेवेत असल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ व नगरसेवक शशांक बावचकर, तानाजी पोवार, चोपडे, उदयसिंह पाटील, आदींनी प्रशासनावर जोरदार टीका केली. यावेळी डॉ. संगेवार यांचे नाव आरोग्य अधिकारी पदासाठी सूचविण्यामागे प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा आरोपही करण्यात आला.
अशा प्रकारे बुधवारच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व चौकाच्या सुशोभीकरणासाठी ३.१२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव, काळ्या ओढ्यातील पाणी शेतीस पुरविण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद, आवळे मैदान, शॉपिंग कॉम्प्लेक्स-स्टेडियम रद्द करून ४.४७ कोटी दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी वापरणे, ५२८ लाभार्थ्यांचे अर्ज म्हाडाकडे पाठविणे, अशा महत्त्वपूर्ण विषयांवरसुद्धा चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
गणपूर्तीअभावी सभा तहकुबीची नामुष्की
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली पालिकेची सभा तब्बल तीन तास चालू राहिल्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास सभागृहामध्ये सदस्यांची संख्या कमी झाली. गणपूर्तीसाठी २१ सदस्य सभागृहात उपस्थित राहण्याचे बंधन असतानाही सभागृहात १७ सदस्य असल्यामुळे सभा तहकूब करावी, असा हरकतीचा मुद्दा नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे अर्ध्या तासासाठी सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्तारूढ आघाडीवर आली. या अर्ध्या तासात सत्तारूढ आघाडीचे नगरसेवक बोलविण्यासाठी धावाधाव करावी लागली. अखेर सभागृहात २२ सदस्य संख्या झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज नगराध्यक्षा स्वामी यांनी सुरू केले. मात्र, तत्पूर्वी सभागृहात वीसच सदस्य उपस्थित असल्यामुळे कॉँग्रेसचे नगरसेवक बावचकर यांनी बुधवारची सभा तहकूब करावी, असे सांगून सभात्याग केला. मात्र, नगराध्यक्षांनी चार वाजता पुन्हा सभा सुरू केली व पुढील चौदा विषयांवर निर्णय घेतले.