चार दिवसांचा पाऊस दोन तासांत; करवीरमध्ये आभाळच फाटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:07 PM2020-09-09T20:07:41+5:302020-09-09T20:12:04+5:30
मंगळवारची रात्र जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यांसाठी वैऱ्याची ठरली. करवीरमध्ये तर आभाळच फाटले. अवघ्या दोन-तीन तासांत तब्बल ४८२ मिलिमीटर पाऊस पडला.
कोल्हापूर : मंगळवारची रात्र जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यांसाठी वैऱ्याची ठरली. करवीरमध्ये तर आभाळच फाटले. अवघ्या दोन-तीन तासांत तब्बल ४८२ मिलिमीटर पाऊस पडला.
सर्कलनिहाय पाऊस पाहिला तर एकट्या पन्हाळा सर्कलमध्ये सर्वाधिक १४० मि.मी. पाऊस नोंदवला गेला. प्रचंड विध्वंस करून गेलेल्या या तुफानी पावसाने नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकविला. चार दिवसांचा पाऊस काही तासांत कोसळल्याने अनेकांनी निसर्गाच्या रुद्रावताराचा विदारक अनुभव घेतला.
तालुकानिहाय पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने मंगळवारी अक्षरश: धिंगाणा घातला. दोन-तीन तासांत २६४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला. त्यात सर्वाधिक ५० मि.मी. पाऊस कागल तालुक्यात, ४७ मि.मी. राधानगरीत, ४३ मि.मी. करवीरमध्ये, ४१ मि.मी. पन्हाळ्यात असा पाऊस नोंदवला गेला. भुदरगडमध्ये २२ मि.मी. वगळता उर्वरित जिल्ह्यात पावसाचा फारसा जोर नव्हता.
चार तालुक्यांतील ३१ सर्कल सर्वाधिक पावसाचे
पाऊस मोजण्यासाठी जिल्ह्यात ७६ सर्कल करण्यात आले आहेत. त्यात सर्कलनिहाय तालुक्यातील पाऊस पाहिला तर चार दिवसांचा पाऊस काही तासांत झाला आहे. करवीर सर्कलमधील ११ गावांमध्ये ४८२ मि.मि. कागल सर्कलमधीलसात गावांमध्ये ३५४ मि.मी. पन्हाळा सर्कलमधील सात गावांमध्ये २८७ मि.मि. राधानगरी सर्कलमधील ६ गावामध्ये २८६ पाऊस झाला आहे. ७६ सर्कलपैकी चार तालुक्यांतील ३१ सर्कलमधील गावांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक पावसाचे गावनिहाय सर्कल (मि.मी.मध्ये)
पन्हाळा १४०, राधानगरी ९८, बालिंगे ९, मुरगूड ९४, सांगरूळ ७९, खडकेवाडा ७०, राशिवडे ६८, करवीर ६६, बिद्री ५८, आवळी ५७, इस्पुर्ली ५५, कागल ४९, कणेरी ४८, हळदी ४२, वडगाव ३८, गारगोटी ३८, कसबा तारळे ३७, कोडोली ३५, सिद्धनेर्ली २९, केनवडे २९, कोतोली २७, निगवे २७, वाडी रत्नागिरी २६, कापशी २५, उत्तूर २२, पिंपळगाव २२, कारवडवाडी २२, शिरोली दुमाला २१.