चौपदरीकरण वाद पेटणार?
By admin | Published: March 10, 2016 01:34 AM2016-03-10T01:34:34+5:302016-03-10T01:34:58+5:30
निर्णयाकडे लक्ष : पालीत बायपासला व्यावसायिकांचा विरोधच
रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय भूसंपादनाच्या विषयावरून वादग्रस्त बनला आहे. पाली येथून मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असतानाच रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाचे चौपदरीकरणही पालीतूनच होणार आहे. मात्र, जमीन संपादनाच्या विषयावरून पालीत दोन मतप्रवाह निर्माण झाले असून, पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण होणार की बायपासचा पर्याय मान्य केला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाली बाजारपेठेतूनच मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे. रस्ता रुंदीकरणासाठी १५ मीटर्स जागा देण्यास पालीतील ८० टक्के प्रकल्पग्रस्त व्यावसायिक व नागरिकांची तयार आहे, असा दावा पाली बाजारपेठेतील व्यावसायिक व नागरिकांच्या पाली विकास समिती अध्यक्ष सदानंद राऊत व पदाधिकारी अमेय वेल्हाळ यांनी बुधवारी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केला. यावेळी समितीचे पदाधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामध्ये गोकुळ लिंगायत, विनोद रसाळ, भालचंद्र ढवळे, विलास राऊत, श्रीकांत राऊत, सुरेश ठाकुर, अशोक लिंगायत, चंद्रशेखर कोठावळे, उमेश शिंदे, सुमंत पालकर, भाऊ वेल्हाळ, मनोज कोलते, सुहास सुर्वे, चंद्रशेखर सुर्वे, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.
पालीतूनच चौपदरीकरण हवे, अशी भूमिका मांडताना जागेबाबत शिथिलता द्यावी, घाटातील रस्त्याबाबतचा निकष वापरावा, अशी मागणी असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाली बाजारपेठेची लांबी मुख्य रस्त्यावर ६०० मीटर्स असून, त्यातील दिडशे मीटर्समध्येच दुकाने, घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच घाटातील रुंदीकरणाचा निकष वापरून कमीत कमी जागा चौपदरीकरणासाठी घेतली जावी. बाजारपेठेतील साडेचारशे मीटर अंतरात मुळातच २५ मीटर्स अंतर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथे समस्या नाहीत, असेही समितीतर्र्फे स्पष्ट करण्यात आले. दिडशे मीटर्समधील व्यावसायिकांची कमीत कमी जागा घेतली जावी, त्यांचा व्यवसायही टिकावा, हीच समितीची भूमिका आहे.
बायपासला आपला विरोध असल्याचे निवेदन समितीतर्फे आमदार उदय सामंत यांना देण्यात आले आहे, तर खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही गुरुवारी (१० मार्च) बायपास नको, ही मागणी करणारे निवेदन दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात
आले.
पालीतून बायपास नको, कमीत कमी जागा वापरून चौपदरीकरण व्हावे व ही बाजारपेठ टिकावी या मागणीसाठी समितीने अनेक मुद्दे मांडले आहेत. पालीतूनच चौपदरीकरण व्हावे. बायपासने अंतर वाढेल व मार्ग उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांर्च अधिक खर्च करावा लागेल.
जमिन व वास्तू यांच्या निर्धारित दराप्रमाणे रक्कम ही ह्यमालकांना त्वरित दिली जावी आणि अन्य मागण्यांवरही विचार करावा, यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पालीतील सर्वच व्यावसायिकांनी बाजारपेठेतून कमीत कमी जागेत चौपदरीकरण व्हावे, यासाठी एकत्र यावे. आता मागणीच्या पूर्ततेसाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहनही समितीतर्फे करण्यात आले.
पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण न झाल्यास पाली बाजारपेठेचे अस्तित्वच संपुष्टात येईल. गेल्या काही वर्षात महामार्गावरील बाजारपेठा वाचविण्यासाठी बायपास काढले गेले. त्याठिकाणच्या बाजारपेठा ओस पडल्या आहेत, त्यांचे वैभव संपुष्टात आले आहे, सावंतवाडी बाजारपेठ हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.
...तर बायपासचा पर्याय?
दुसरीकडे पालीतून चौपदरीकरण न करता बायपास काढावा, अशी मागणी तेथीलच काही व्यावसायिकांनी केली आहे. मात्र, चौपदरीकरणात अधिक प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिल्यास पाली बाजारपेठेतून चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा होईल. मात्र, विरोध झाल्यास बायपासचा पर्याय राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.