अमली पदार्थ बाळगलेले चौघे गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:44+5:302021-07-15T04:18:44+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर अमली पदार्थाची देवाण-घेवाण करणाऱ्या चौघांना गडहिंग्लज पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. यातील ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर अमली पदार्थाची देवाण-घेवाण करणाऱ्या चौघांना गडहिंग्लज पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. यातील तिघे जण निपाणीचे असून एकजण चंदगड तालुक्यातील आहे. त्यांच्याकडून ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी इराप्पा रामा बागेवाडी (वय २१), मोईन जुबेर बागवान (वय १८), प्रदीप प्रभाकर मुगळे (वय १९, सर्वजण रा. निपाणी) व गणेश परशुराम कांबळे (वय २५, रा. आमरोळी, ता. चंदगड) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, मंगळवार (१३) दुपारच्या सुमारास इराप्पा हा आपल्या दुचाकीवरून मोईन व प्रदीप याला घेऊन गडहिंग्लज-शेंद्री रोडवरील एमआयडीसी परिसरात आले. याचवेळी पोलिसांना या परिसरात अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी परिसरात सापळा लावला.
दरम्यान, या परिसरात गणेश कांबळे याच्याकडे अमली पदार्थ देत असताना पोलिसांनी त्यांच्यावर धाड टाकून मुद्देमालासह चौघानाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे हिरवट पाने, फुले, काड्या, बिया असा गांजासदृश अमली पदार्थ, दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला.
मारुती ठिकारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
फोटो ओळी : गडहिंग्लज-शेंद्री रोडवरील एमआयडीसी परिसरात पोलिसांनी छापा टाकून जप्त केलेला अमली पदार्थाचा साठा.
क्रमांक : १४०७२०२१-गड-०८