राष्ट्रीय महामार्गावरील चार उड्डाणपूल पुन्हा उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:33 AM2019-11-21T00:33:21+5:302019-11-21T00:33:25+5:30
तानाजी पोवार । कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राष्टÑीय महामार्गावर पाणी येऊन प्रमुख दळणवळण ठप्प होते. याचा फटका अनेक राज्यांना ...
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राष्टÑीय महामार्गावर पाणी येऊन प्रमुख दळणवळण ठप्प होते. याचा फटका अनेक राज्यांना बसत आहे. त्यासाठी मुंबई ते चेन्नई या एशियन महामार्ग ४८ वरील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख चार उड्डाणपूल पाडून ते नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्याला सहापदरीकरणातच मूर्त स्वरूप येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापुराचे पाणी अक्षरश: सांगली फाट्याजवळ राष्टÑीय महामार्गावर आले. सुमारे सहा दिवस महामार्गावर पाणी राहिल्याने राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक राज्यांच्या दळणवळण व्यवस्थेला याचा फटका बसला. महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यात डिझेल-पेट्रोलसह भाजीपाल्याची टंचाई तीव्रतेने भासली. त्यामुळे पाण्याखाली जाणारे मार्ग उचलून घेण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील गांधीनगर, उजळाईवाडी विमानतळ, उचगाव, कागल हे चार प्रमुख उड्डाणपूल पाडून ते नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यांची उंची तितकीच ठेवून लांबी आणखी दहा मीटर वाढविण्यात येणार आहे.
सध्या गांधीनगर, उजळाईवाडी विमानतळ, उचगाव, कागल या उड्डाणपुलांची लांबी कमी आहे. ते उड्डाणपूल पाडून सहापदरीकरणांतर्गत नव्याने जादा लांबीचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर त्याबाबतचे सर्वेक्षण खासगी कंपनीद्वारे करून तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
उड्डाणपुलाची रुंदी वाढणार
महामार्गावरील प्रमुख जुने उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नव्याने दीर्घ लांबीचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या पुलाखाली वाहतुकीसाठी १० बाय १० असे एकूण २० मीटरचे गाळे आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते; पण नव्याने होणाºया उड्डाणपुलाखालील रस्ता उचलण्यात येणार असून, सुमारे २० बाय २० लांबीचे असे दोन गाळे एकूण ४० मीटरचे होणार आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीपासून व पुराच्या पाण्यापासून मुक्तता होणार आहे.
‘बास्केट ब्रिज’चा रस्ता थेट कोल्हापुरात
सहापदरीकरणाच्या कामातच गाजावाजा होऊन अडकलेल्या ‘बास्केट ब्रिज’ला मूर्त स्वरूप येईल. महामार्गावरून पंचगंगा नदीच्या पैलतीरापासून शिरोली नाक्यापर्यंत असा सुमारे १२६० मीटर लांबीचा वक्र होऊन शहरात प्रवेश करणारा हा ‘बास्केट ब्रिज’ आहे. महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश करणारी वाहतूक थेट बास्केट ब्रिजवरून शहरात येणार आहे.