चौघा लुटारूंना अटक
By admin | Published: May 25, 2014 12:55 AM2014-05-25T00:55:41+5:302014-05-25T01:00:48+5:30
कृषी महाविद्यालयासमोर तरुणाला लुटले होते
कोल्हापूर : कृषी महाविद्यालयासमोर मोटारसायकलवरून जाणार्या तरुणास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेणार्या चौघा संशयित लुटारूंना आज, शनिवारी करवीर पोलिसांनी अटक केली. सागर पांडुरंग माने (वय २६, रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स कळंबा), रोहित नारायण केसरकर (२३, रा. संभाजीनगर), सलमान शफीक मुकादम (२१, रा. शाहूनगर), प्रशांत महालिंग सनदी (२३, रा. माऊली पुतळ्यासमोर राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी अनुप आप्पासो पोवार (२४) हा ३ सप्टेंबर २०१३ रोजी मोटारसायकलवरून कृषी महाविद्यालयासमोरून जात होता. यावेळी सागर माने, रोहित केसरकर, सलमान मुकादम व प्रशांत सनदी यांनी त्याला अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली होती. त्यापासून ते पसार झाले होते. दरम्यान, करवीर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथकाला कळंबा साई मंदिर येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी या परिसरात पाळत ठेवली असता चौघे मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तरुणाला लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या सर्वांना राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तपास पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे करत आहेत. (प्रतिनिधी)