चारच उद्याने, पण तीही दुर्लक्षित
By admin | Published: November 5, 2014 10:14 PM2014-11-05T22:14:00+5:302014-11-05T23:31:37+5:30
जीवनावश्यक, तरीही सवड नाही : ‘ढपला’ संस्कृतीमुळे मोठ्या कामांकडे लक्ष
राजाराम पाटील - इचलकरंजी शहरातील उद्याने व क्रीडांगणे ही फुप्फुसे व हृदय असल्याचे मानण्यात येते. शहराच्या आरोग्याबरोबर नागरिकांसाठी उद्याने व क्रीडांगणे जीवनावश्यक आहेत. इचलकरंजीसारख्या २७ चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या आणि तीन लाख लोकसंख्येच्या शहरात चारच उद्याने असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकांचे कैवारी म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आणि पालिका चालविणाऱ्या प्रशासनाला शहराच्या या जीवनावश्यक बाबींकडे लक्ष पुरवायला वेळच नाही, याची खंत नागरिकांना वाटत आहे.
आबालवृद्धांच्या जीवनात उद्यानाचे खूप महत्त्व आहे. वृद्धांना विरंगुळा म्हणून फेरफटका मारण्यासाठी, लहान मुलांना खेळण्या व बागडण्याचे साधन म्हणून, तर युवकांना व्यायामासाठी उपयुक्त, अशा या उद्यानांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. उद्याने व छोट्या बागा यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी साहाय्य मिळते. इचलकरंजीत महात्मा गांधी उद्यान, शिवाजी उद्यान, राणी बाग व शहीद भगतसिंग उद्यान अशी चारच उद्याने आहेत आणि प्रत्येक उद्यानाकडे छोटेसे बालोद्यान आहे. चारही उद्यानांमधील हिरवळी नष्ट झाल्या आहेत. छोट्या-मोठ्या झुडपांची निगा नसल्याने शोभेची फूलझाडेसुद्धा विद्रुप झाली आहेत. हीच अवस्था वृक्षांची आहे.
उद्यानांमध्ये असलेले कारंजे वापराविना गंजले आहेत, तर त्यांच्या खाली असलेले हौद तुटलेले-फुटलेले आहेत. कुंपण म्हणून लावलेली मेहंदी आणि शोभेच्या झाडांना आकर्षक आकार नसल्याने त्यांचे स्वरूप ओंगळवाणे झाले आहे. पुतळ्यांचा उडालेला रंग बागांना अधिकच विद्रुप करीत आहे. बालोद्यानामधील विविध प्रकारची खेळणी आणि झोपाळे तुटले आहेत. राणी बागेतील झोपाळ्यांना विद्युत मोटारींना वापरात असलेले व्ही-बेल्ट बांधून नागरिकांनी त्याचा झोपाळा केला आहे.
निवडणूक काळामध्ये नागरिकांच्या आरोग्य स्वच्छतेकडे लक्ष पुरवू, असे सांगून निवडून आलेल्या नगरसेवकांना मात्र उद्यानासारख्या ‘छोट्या’ कामाकडे लक्ष पुरविण्यासाठी वेळ नाही. नगरसेवक मोठा ‘ढपला’ पाडण्यासाठी मोठ्या कामांकडेच लक्ष देत असल्याने उद्यानांसारख्या लहान बाबींकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. (क्रमश:)
खाऊ गल्लीने उद्यानाचे अस्तित्व धोक्यात
महात्मा गांधी उद्यानाच्या तिन्ही बाजूच्या रस्त्यांवर खाऊ गल्ली विकसित झाली आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे खरकटे उद्यानाच्या तिन्हीही बाजंूच्या कुंपणालगत गटारीमध्ये टाकले जाते. काही वेळा ते उद्यानाच्या आतील बाजूस टाकण्यात आल्याने उंदीर व घुशी यांचे साम्राज्य त्याठिकाणी झाले आहे. या उंदीर व घुशींनी आता छोट्या-मोठ्या झाडा-झुडपांची मुळे कुरतडण्यास सुरुवात केल्याने वृक्षांचे आयुष्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर या उद्यानाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.
२५ वर्षांत नवे उद्यानच नाही
साधारणत: २५ वर्षांपूर्वी त्यावेळी नव्याने विकसित केलेले भगतसिंग उद्यान लोकांसाठी खुले झाले. त्यानंतर नगरपालिकेच्या आयुष्यात डझनभर नगराध्यक्ष झाले. त्यापैकी अर्धा डझन नगराध्यक्ष महिला होत्या. महिलांची सौंदर्यदृष्टी चांगली असते, असा समज असूनही उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीकडे आणि सौंदर्यीकरणाकडे लक्ष दिलेच नाही किंवा नवीन उद्यानांची उभारणी झाली नाही, याचीच खंत नागरिकांना वाटत आहे.
मिनी ट्रेनचा प्रस्ताव प्रलंबित
साधारणत: दहा वर्षांपूर्वी शहीद भगतसिंग उद्यानाकडे आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी मिनी ट्रेन, जॉर्इंट व्हिल अशा बाबी किफायतशीर दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला होता; पण पालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचे कारण सांगत तो बाजूला पडला. वास्तविक बीओटी तत्त्वावर याची उभारणी करता आली असती; पण त्याकडे दुर्लक्षच झाले.
चौकांचे विद्रुपीकरण
शहरातील प्रमुख चौकांचे पालकत्व काही संस्थांना देऊन त्यांच्याकडून या चौकांचे सुशोभीकरण साधारणत: दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. सुरुवातीची दोन-तीन वर्षे त्या संस्थांनी त्यांची देखभाल-दुरुस्ती केली. त्यानंतर मात्र शहरातील सर्वच चौक दुर्लक्षित राहिले. चौकांमधील आयर्लंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झुडपे उगवून त्याचे विद्रुपीकरण झाले आहे.
चौकांचे विद्रुपीकरण
शहरातील प्रमुख चौकांचे पालकत्व काही संस्थांना देऊन त्यांच्याकडून या चौकांचे सुशोभीकरण साधारणत: दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. सुरुवातीची दोन-तीन वर्षे त्या संस्थांनी त्यांची देखभाल-दुरुस्ती केली. त्यानंतर मात्र शहरातील सर्वच चौक दुर्लक्षित राहिले. चौकांमधील आयर्लंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झुडपे उगवून त्याचे विद्रुपीकरण झाले आहे.