आमदारांची साडेचारशे कामे प्रस्तावित

By admin | Published: July 26, 2014 12:11 AM2014-07-26T00:11:30+5:302014-07-26T00:18:11+5:30

आमदारांची धावपळ : सा. रे. पाटील यांची सर्वाधिक १०८ कामे : चंद्रदीप नरके यांनी सुचविली फक्त चार कामे

Four hundred works of MLAs proposed | आमदारांची साडेचारशे कामे प्रस्तावित

आमदारांची साडेचारशे कामे प्रस्तावित

Next

प्रवीण देसाई - कोल्हापूर
चालू आर्थिक वर्षात विविध कामांवर खर्च करून उरलेल्या निधीमध्ये जिल्ह्यातील आमदारांनी ६ कोटी ६८ लाख ९३ हजार रुपयांची ४४६ कामे प्रस्तावित केली आहेत. रस्ते, सांस्कृतिक सभागृह, बोअरवेल, गटर्स, व्यायामशाळा बांधणे या स्वरूपाची ही कामे आहेत. येणाऱ्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित केलेली कामे मंजूर करून घेण्यासाठी आमदार व जिल्हा नियोजन समिती कार्यालयाची चांगलीच धावपळ सुरू आहे.
शिरोळचे आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी ३२ लाख रुपयांच्या शिल्लक निधीमध्ये १०८ कामे प्रस्तावित केली आहेत. यामध्ये ९० कामे ही मतदारसंघातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी शैक्षणिक सीडी देण्यासंदर्भातील आहेत; तर १८ कामे रस्त्यांसाठी आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर दक्षिणचे आमदार तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ५६ लाखांच्या निधीमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील महापालिकेच्या २० प्रभागांमध्ये विकासकामे सुचविली आहेत. यामध्ये प्रत्येक प्रभागातील सरासरी पाच कामे असून, ती रस्ता करणे व गटर्स बांधणे या स्वरूपाची आहेत. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी ६४ लाखांच्या निधीमध्ये ५७ कामे प्रस्तावित केली आहेत. यातील ४८ बोअरवेलसाठी, आठ रस्ते करण्यासाठी, तर नगरपालिकेच्या ‘आयजीएम’ रुग्णालयासाठी एक रुग्णवाहिका अशी कामे आहेत.
जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल मतदारसंघात ४८ लाखांची ३६ कामे प्रस्तावित केली आहेत. ही सर्वच कामे सांस्कृतिक सभागृहांची आहेत. शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी ९१ लाखांची ३२ कामे सुचविली आहेत. यामध्ये रस्त्यांची २४ व सांस्कृतिक सभागृहांची आठ कामे आहेत. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ४२ लाखांची ३० कामे प्रस्तावित केली आहेत. उद्यानाच्या सुशोभीकरणाची २२, तर व्यायामशाळा बांधण्याची आठ कामे यामध्ये आहेत.
राधानगरीचे आमदार के. पी. पाटील यांनी ८९ लाख रुपयांची २४ कामे प्रस्तावित केली आहेत. यामध्ये खुली सभागृहे १९, क्रीडासाहित्य दोन व रस्ते दोन अशी कामे आहेत. चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी ९६ लाखांची २४ कामे प्रस्तावित केली असून, ती रस्ते १४, बोअरवेल पाच, वाचनालयांना संगणक पाच या स्वरूपाची आहेत. २९ लाखांची २१ कामे हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सुचविली आहेत. यामध्ये रस्ते १८ व सांस्कृतिक सभागृहे तीन आहेत. सर्वांत कमी कामे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांची आहेत. शिल्लक राहिलेल्या १९ लाखांच्या निधीमध्ये सांस्कृतिक सभागृहांची चार कामे सुचविली आहेत.
विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांनी १ कोटी २ लाख ९३ रुपयांची २० कामे सुचविली आहेत. त्यांपैकी रस्ते ६, सांस्कृतिक सभागृह ५, मैदान सुशोभीकरण २, व्यायाम साहित्य देणे २, संरक्षक भिंत २, शाळा खोली बांधणे १ व गटर्स बांधणे २ अशा कामांचा समावेश आहे. ‘पदवीधर’चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एप्रिल ते जुलैपर्यंत मिळालेला ६६ लाख ६६ हजारांचा सर्वच निधी विकासकामांवर खर्च केला आहे. त्यांच्या नवीन कार्यकाळातील निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे; परंतु या निधीतील कोणतेही काम त्यांनी प्रस्तावित केलेले नाही.
४आमदारांनी सुचविलेली कामे जिल्हा नियोजन विभागाकडून संबंधित विभागाकडे (ही कामे ज्यांच्या कार्यकक्षेत येतात तो) पाठवून त्यांच्याकडून या कामांचे इस्टिमेट तयार करून घेतले जाते.
४यावर छाननी होऊन या कामांची फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाते. त्यांच्या सहीने ही कामे मंजूर होतात. काम मंजूर झाल्यावर ७५ टक्के व पूर्ण झाल्यावर उर्वरित २५ टक्के निधीचे पैसे वर्ग केले जातात.

आमदारांचे प्रस्तावित कामांचे ७० टक्के प्रस्ताव मंजूर झाले आहेत. उरलेले ३० टक्के काम येत्या पंधरा दिवसांत पूर्ण केले जाईल. येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंजुरीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दररोज किमान चार फाईल्स मंजुरीसाठी पाठविल्या जात आहेत.
- बी. जे. जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी

Web Title: Four hundred works of MLAs proposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.