दोनवडे येथील अपघातात नाशिकमधील चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2016 12:36 AM2016-08-28T00:36:41+5:302016-08-28T00:36:41+5:30
चालकाचा ताबा सुटला : गाडी झाडावर आदळली
कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडेजवळ झालेल्या ट्रॅक्स अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. यात पोपट देवरे (वय ३७), सतीश देवरे (३५), दिलीप पोवार (२६), सचिन सोनवडे (२६, सर्व रा. मालेगाव, ता. देवळा, जि. नाशिक) यांचा समावेश असून, त्यांना स्थानिक नागरिकांनी मदत करत सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील दहिवड, उमरा, मालेगाव येथील आठ युवक ट्रॅक्स (एमएच ४१ व्ही ९७१०) मधून तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून गोवा व तळकोकणातील पर्यटनस्थळे पाहून ते शुक्रवारी दुपारी परतीच्या मार्गावर होते.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे आले असता चालक राजेंद्र मोरे याचा ताबा सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. ही धडक इतक्या जोराची होती की, शेजारील घरांना त्याचा हादरा बसला. यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. या धडकेत गाडी उलटली. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
या अपघातात गाडीतील चारजण जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी १०८ या आपत्कालीन रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. (वार्ताहर)