उदगावजवळ चार ठार

By admin | Published: September 15, 2015 01:34 AM2015-09-15T01:34:47+5:302015-09-15T01:34:47+5:30

मुंबईचे दोघे जखमी : झायलो कार-दूध टॅँकरची समोरासमोर जोरदार धडक

Four killed in Udagaon | उदगावजवळ चार ठार

उदगावजवळ चार ठार

Next

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील बस स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री झालेल्या दूध टँकर व झायलो गाडीच्या अपघातात झायलो कारमधील चौघेजण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये झायलो गाडीचा चक्काचूर झाला. घटनेनंतर टॅँकरचालक फरार झाला.
शिवराज बाजीराव पाटील (वय ३०) कपिल विजय पाटील (२८), प्रवीण प्रकाश मोहिते (३५, सर्व रा. कर्नाळ, ता. मिरज जि.सांगली) व अनंतकुमार शांतीनाथ खोत (३५, रा. नांद्रे) अशी मृतांची नावे आहेत, तर संतोष गणू दैत्य (३०, रा. भांडूप मुंबई) व सचिन सोमा जामखंडेकर (३०, रा. तांबेनगर मुलुंड (वेस्ट), मुंबई) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री दीडच्या सुमारास झायलो गाडी (एम एच ०५ ए एम ८७४१) जयसिंगपूरहून नांद्रेकडे, तर शिवपार्वती रोडलाइन्स चिकुर्डेचा दूध वाहतूक करणारा टॅँकर (एम एच १० बी आर १०१०) हा सांगलीहून जयसिंगपूरकडे येत होता. उदगाव येथील बस स्थानक चौकात दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये झायलो गाडीमधील सहाजणांपैकी चालक अनंतकुमार खोत (रा. नांद्रे) याच्यासह शिवराज पाटील, कपिल पाटील, प्रवीण मोहिते (रा. कर्नाळ, ता. मिरज) हे चौघेजण जागीच ठार झाले. तर संतोष दैत्य, सचिन जामखंडेकर हे दोघे जखमी झाले आहेत. यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गाडीचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
झायलो गाडीचे चाक पंक्चर झाल्याने गाडी पलटी होऊन समोरून येणाऱ्या दुधाच्या टॅँकरला धडकली, अशी घटनास्थळावर चर्चा होती. रात्री दीडच्या सुमारास अपघाताचा मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. तर दोघांना खासगी दवाखान्यात हलविले. पहाटे अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातही नातेवाइकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची वर्दी जहॉँगीर गुलाब मुजावर यांनी येथील पोलिसांत दिली आहे.
घरी परतताना अपघात
अपघातातील मृत व जखमी नांद्रे येथे राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे कार्यक्रमासाठी आले होते. रात्री गावाकडे परतत असताना हा अपघात झाला. अपघातस्थळी राष्ट्रवादी पक्षाचे स्कार्प, शाल, श्रीफळ असे साहित्य पडले होते.
नांद्रे, कर्नाळमध्ये शोककळा; गाव बंद; मृतांवर अंत्यसंस्कार
नांद्रे : उदगाव (ता. शिरोळ) येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याचे समजताच नांद्रे व कर्नाळ (ता. मिरज) गावांवर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून मृतांना आदरांजली वाहिली. मृतांवर नांद्रे व कर्नाळमध्ये सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी रात्री ट्रक आणि झायलो मोटार यांची धडक होऊन शिवराज पाटील, कपिल पाटील, प्रवीण मोहिते (तिघे रा. कर्नाळ) व अनंतकुमार खोत (नांद्रे) ठार झाले होते, तर त्यांचे मित्र संतोष दैत्य व सचिन जामखंडेकर (मुंबई) गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच मृतांचे
नातेवाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. शवविच्छेदन तपासणीनंतर मृतदेह सोमवारी सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
गाडीचा चक्काचूर
अपघातानंतर झायलो गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. दरवाजे तोडून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागला. जयसिंगपूर येथील शीतल गतारे, राजेंद्र आडके, नांदणीचे राजू कुरडे यांच्यासह इतर तरुणांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले.
दोघे बचावले
झायलो गाडीमध्ये सहाजण प्रवास करीत होते. चालकाबरोबरच पुढे बसलेला एकजण व मध्यभागी बसलेले दोघेजण जागीच ठार झाले, तर शेवटच्या सीटवर बसलेले दोघेजण बचावले. (वार्ताहर)

Web Title: Four killed in Udagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.