शिये टोलनाक्याजवळील बंगल्यात चार लाखांची चोरी
By admin | Published: April 20, 2017 11:57 PM2017-04-20T23:57:37+5:302017-04-20T23:57:37+5:30
रोख रकमेसह दागिन्यांचा समावेश : कुटुंबीय सहलीला गेले असता चोरट्यांचा डल्ला
कसबा बावडा : एम.आय.डी.सी. रोडवरील शिये टोल नाक्याशेजारील शेतवडीत असलेल्या बंगल्याचा अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार असा एकूण साडेचार लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली व मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सावंता बापूसाहेब माळी यांच्या घरात ही घटना घडली. याबाबत शाहूपुरी पोलिसांत नोंद झाली आहे. घटनास्थळी श्वानपथकाने पाहणी केली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सावंता बापूसाहेब माळी आपल्या परिवारासह दक्षिण भारत सहलीला गेले होते. ते जेव्हा बाहेर गावी जातात तेव्हा त्यांचा नोकर राजाभाऊ एकनाथ नवले बंगल्याच्या खालील खोलीत राहायला असतो. सोमवारी रात्री तो उसाला रात्रपाळीचे पाणी देण्यासाठी दुसऱ्या शेताकडे गेला. सकाळी येऊन पाहतो, तर बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले होते.
बंगल्यातील साहित्यही विस्कटलेले होते. त्यांनी आपल्या मालकांना मोबाईलवरून ही माहिती दिली. सावंता माळी यांनी दक्षिण भारताच्या दौऱ्यावरून आपण लगेचच घटनास्थळी पोहचू शकत नाही म्हणून आपल्या रायगड येथे डॉक्टर असलेल्या संजय या मुलाला ही माहिती दिली.
संजय माळी यांनी ही माहिती पोलिसांनी दिली; परंतु नेमकी किती रुपयांची चोरी झाली, हे सावंता माळी घरी नसल्याने समजू शकत नव्हते. माळी कुटुंब बुधवारी रात्री कोल्हापूरला आल्यानंतर पोलिसांनी पुढे तपास सुरू केला. घटनास्थळी श्वान घुटमळले.
माळी कुटुबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे १५ तोळे दागिने चोरीला गेले असल्याचे सांगितले. त्यात गंठण, बांगड्या यांचा समावेश आहे. तसेच रोख पाच हजार रुपये गेल्याचेही सांगण्यात आले.
(वार्ताहर)