पावसामुळे पालिकेचे चार कोटी खड्ड्यात
By Admin | Published: July 18, 2016 11:33 PM2016-07-18T23:33:46+5:302016-07-19T00:13:36+5:30
इस्लामपुरातील चित्र : नवीन रस्त्यांचा फ्लॉप शो; निकृष्ट कामाबाबत विरोधक आवाज उठविणार
अशोक पाटील -- इस्लामपूर पालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर जवळजवळ पावणेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे रस्ते पहिल्याच पावसात धुऊन गेल्याने ठिकठिकाणी पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यावर विरोधी पक्षांनी आवाज उठवला असला तरी, सत्तेच्या धुंदीत असलेल्या सत्ताधाऱ्यांना याचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी या प्रकारावर मौन धारण करणे पसंद केले आहे.
शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे काम युनिटी बिल्डर्स अँड रोड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि., कराड यांना देण्यात आले होते. रस्ते तयार करताना ठेकेदाराने नियम व अटींचे पालन केलेले नाही. याविरोधात वेळोवेळी काँग्रेसचे वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार यांनी काम बंद पाडून नियमाने रस्ते करण्याची मागणी केली होती. यावरुन अनेकवेळा सत्ताधाऱ्यांबरोबर खडाजंगीही झाली होती. तरीही मुजोर असलेल्या सत्ताधारी व ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचीच कामे केली आहेत. यामुळेच पहिल्याच पावसात सर्व काही धुऊन गेले आहे.
शहरात विविध ठिकाणी केलेले रस्ते आणि त्यावर केलेला खर्च पाहता रस्त्याचा दर्जा सर्वसामान्यांच्या नजरेतून सुटत नाही. या रस्त्यातून किती लाखांचा मलिदा मिळाला, याची आकडेमोड करण्यात विरोधकांनी डोकी लावली आहेत. आतापर्यंत शहरात झालेल्या रस्त्यांवरील खर्च : १. आष्टा नाका ते तहसील कार्यालयापर्यंत (७४ लाख ५० हजार ५००). २. आष्टा नाका ते संभूआप्पा मठ ते मुरारराव शिंदे घर (४९ लाख ९२ हजार). ३. शिराळा नाका ते मोमीन मोहल्ला ते उर्दू हायस्कूल ते जयसिंह टॉकीज (६१ लाख ६५ हजार ५००). ४. झरी नाका ते आझाद चौक ते संभाजी चौक ते यल्लमा चौक (७४ लाख ९९ हजार ८००). ५. जुनी भाजी मंडई ते शाळा नं. १ पर्यंत (६२ लाख २० हजार. ६. शिराळा नाका ते गणेश मंदिर ते कापूसखेड नाका (४३ लाख २५ हजार). ७. यल्लम्मा चौक ते जुना बहे नाका (४३ लाख २५ हजार), असे पावणेचार कोटी रुपये खर्ची पडले आहेत. या रकमेच्या तुलनेत रस्ते झालेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. रस्त्यांची कामे देताना ठेकेदाराकडून करारपत्र घेण्यात येते. या करारपत्राप्रमाणे रस्त्याची कामे झालीच नाहीत. करारपत्रावरील काही तारखा हाताने लिहिल्या आहेत. त्यामुळे पालिका आणि ठेकेदार यांच्यामध्ये झालेला करारही संशय निर्माण करणारा असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे.
एकंदरीत शहरातील झालेली सर्वच विकासकामे निकृष्ट
दर्जाची झाली असून, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरासह जिल्ह्यातील विकास कामांवर नवोदित राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही बैठका घेऊन लक्ष घातले आहे. यातून काय साध्य होणार, हे आगामी काळातच समजणार आहे.