कोल्हापुरातील कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांकडे मिळाले चार मोबाइल, तीन कैद्यांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:37 PM2023-08-21T12:37:01+5:302023-08-21T12:38:12+5:30

मोबाइलवरून चालते अवैध धंद्यांचे रॅकेट, पुण्यातील पथकाकडून कारागृहाची झडती

Four mobile phones were found in the custody of Mokka prisoners in Kalamba Jail in Kolhapur | कोल्हापुरातील कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांकडे मिळाले चार मोबाइल, तीन कैद्यांवर गुन्हा 

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांकडे मिळाले चार मोबाइल, तीन कैद्यांवर गुन्हा 

googlenewsNext

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैद्यांकडील मोबाइलचा शोध घेण्यासाठी पुणे येथील कारागृह पोलिस मुख्यालयातील पथकाने आणि कळंबा कारागृहातील सुरक्षारक्षकांनी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस शोधमोहीम राबवली. या कारवाईत मोक्कातील कैद्यांकडे चार मोबाइल मिळाले. याबाबत तीन कैद्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अजय भानुदास कुलकर्णी, विद्यासागर उर्फ राजेश नामदेव चव्हाण आणि जमीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत.

कळंबा कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील कैदी मोबाइल लपवून आत प्रवेश करतात. काही वेळा कारागृहाच्या भिंतींवरून मोबाइल आत फेकले जातात. कैद्यांकडून मोबाइलचा वापर वाढला असून, कारागृहात बसून सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही गुन्हे घडविल्याचेही समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील कारागृह पोलिस मुख्यालयातील पथकाने शनिवारी रात्री कळंबा कारागृहाची झडती घेतली.

यावेळी सर्कल क्रमांक पाचमधील बरॅक क्रमांक तीनच्या शौचालयात तीन मोबाइल सापडले. मोक्कातील कैदी अजय कुलकर्णी, विद्यासागर चव्हाण आणि जमीर शेख यांनी मोबाइल लपवून ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याबाबत कारागृह रक्षक भारत उत्तरेश्वर पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तिघांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत तुरुंग अधिकारी मोरे यांनी फिर्याद दिली.

हिस्ट्री डिलीट

कारागृहात कैद्यांकडून साधे मोबाइल वापरले जातात. फोन केल्यानंतर मोबाइल लपविताना त्यातील कॉल हिस्ट्री डिलीट केली जाते. त्यामुळे कोणाला फोन लावला, याचे पुरावे मिळत नाहीत. बहुतांश मोबाइलमध्ये सिम कार्डही नसते.

मोबाइल आत जातातच कसे?

कारागृहाच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त असतो. कैदी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना आत सोडले जाते. कारागृहाच्या भिंतींवरील मनोऱ्यांवरही सुरक्षारक्षक तैनात असतात. असे असतानाही मोबाइल कारागृहात जातातच कसे, असा सवाल जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

मोबाइलवरून चालते अवैध धंद्यांचे रॅकेट

मोक्कासह अनेक गंभीर गुन्ह्यांतील कैदी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. कारागृहात बसून ते मोबाइलद्वारे अवैध धंदे चालवितात. सांगली आणि पुण्यात घडलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये संशयितांना कळंबा कारागृहातील कैद्यांनी मोबाइलवरून सूचना दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

Web Title: Four mobile phones were found in the custody of Mokka prisoners in Kalamba Jail in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.