...अन् अडकलेल्या आजीबाई चार महिन्यानंतर पोहोचल्या लेकीच्या गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 04:46 PM2020-07-19T16:46:20+5:302020-07-19T21:52:21+5:30
लॉकडाऊनमुळे चार महिने कुशिरे (ता.पन्हाळा) येथे मंदिरात राहत असणाऱ्या आजीबाई आज आपल्या लेकीच्या गावी गेल्या.
पोहाळे तर्फ आळते/कोल्हापूर :लॉकडाऊनमुळे चार महिने कुशिरे (ता.पन्हाळा) येथे मंदिरात राहत असणाऱ्या आजीबाई आज आपल्या लेकीच्या गावी गेल्या. या आजीचे नाव किसनाबाई गणेश चकोर (मु.पो. निराळी ता.सिन्नूर जिल्हा नाशिक) असे आहे.
आज रविवार दि.19 जुलै रोजी हया आजीला पन्हाळा तहसिलदार, कुशिरे दक्षता समिती यांनी ई-पास काढून चारचाकी मोटारगाडीने तिच्या लेकीच्या गावी मोहपाडा (ता.खालापुर जि.रायगड) येथे पाठविले. तिच्या मुलीकडे पाठविण्यासाठी कुशिरे येथील तलाठी सुवर्णा कराड यांनी परिश्रम घेतले.
नाशिक जिल्हयातील ७० वर्षाची वृध्दा मार्च महिन्यात महालक्ष्मी, जोतिबा देवाचे देवदर्शन घेण्यासाठी रेल्वेने कोल्हापूरात आल्या होत्या. लॉकडाऊन होण्यापूर्वी तिने कोल्हापूरातील देवदेवतांचे दर्शन घेतले आणि गावी माघारी जाण्यासाठी निघाली तेवढयात कोरोनाचं सावटामुळे कोल्हापूर जिल्हा लॉकडाऊन झाला.
रेल्वे व एसटी सेवा बंद झाली. जोतिबा डोंगरावर असणाऱ्या या आजी पायवाटीतून कुशिरे गावात आल्या. दरम्यान कुशिरे येथील दक्षता समितीने तिची ग्रामदैवत हनुमान मंदिरात राहण्याची व्यवस्था केली व जेवणाची व्यवस्था गुरव यांच्या घरी केली.
गावाकडे आपली विवाहीत मुलगी आहे ती मला सांभाळेल अशी ती सारखी बोलत होती मात्र, मुलीचा मोबाईल नंबर तिला सांगता येत नव्हता. कुशिरे येथील तलाठी सुवर्णा कराड यांनी तिला विश्वासत घेऊन मानसिक आधार दिला तसेच आजीच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली.
आजीची कौटुंबिक माहिती घेऊन तिच्या मुळ गावी महसूल यंत्रणेमार्फत शोध घेतला व तिच्या मुलगीचा मोबाईल क्रमांक मिळविला. या आजीने आपल्या मुलीबरोबर मोबाईलद्वारे संभाषण केले.
सोमवारपासून दि.२० जुलैपासून कोल्हापूर जिल्हा बंदी असल्याने या वृध्द महिलेला आज तिच्या कुटुंबीयाकडे पाठविण्यासाठी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, निवासी तहसीलदार कौलवकर, मंडल अधिकारी दाणी व तलाठी सुवर्णा कराड, कुशिरे सरपंच अनुराधा घोरपडे, पोलीस पाटील, संदीप माळवी,सर्जेराव घोरपडे, ग्रापंचायत सदस्य संतोष साबळे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.